डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. गोविंद पानसरे किंवा लेखक कलबुर्गी हे कर्मकांडाच्या विरोधात बोलत होते म्हणून त्यांची हत्या झाली नाही. तर त्यांनी धर्मचिकित्सा आरंभली होती. धर्मातील शोषणावर ते बोलायला लागले होते. त्यामुळे त्यांच्या हत्या झाल्या. सत्ताधाऱ्यांकडून त्यांचे मारेकरी पकडले जातील, याची अजिबात शाश्वती नाही. मात्र, त्यांचे काम आपल्याला पुढे न्यायचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी केले.

सेवादल शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलेत होते. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येला चार वर्षे होऊनही मारेकऱ्यांनी अद्यापही शासन पकडू शकले नाही. त्या विरोधात आंदोलने आणि सभा घेऊन समितीच्यावतीने २० जुलै ते २० ऑगस्ट या एका महिन्यात ‘जबाब दो’ आंदोलन आरंभले होते. त्या आंदोलनाचा समारोप कार्यक्रमात सुभाष वारे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष जगजित सिंग, संस्थेचे संस्थापक केशवराव शेंडे, समितीचे कार्याध्यक्ष मधुकर धंदरे, उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे आणि सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

वारे म्हणाले, काँग्रेसच्या काळात डॉ. दाभोळकरांची हत्या झाली मात्र, तीन वर्षे होऊनही भाजप सरकारने काहीही केले नाही. कुटुंबातील सदस्य गेल्यापेक्षाही जास्त वेदना त्यांच्या जाण्याने झाल्या. तिघांमध्येही एक साम्य होते. तिघेही मूलभूत परिवर्तनाची गोष्ट मांडायचे. माणसे दुखावली जाणार नाहीत, याची काळजी घ्यायचे. अंनिसने सुरुवात भांडाफोड, चमत्कार यापासूनच केली. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवण्यावर ते भर देऊ लागले. शोषणाची व्यवस्था ही धर्मसंस्थेमुळे आहे. धर्माच्या विधायक चिकित्सेला त्यांनी सुरुवात केली आणि परंपरावाद्यांना त्यांची भीती वाटायला लागली. त्यांचे मारेकरी भलेही सापडणार नाहीत. पण, त्यांच्या हातात बंदुका देणारे कोण होते हे तर सर्वाना माहिती आहे आणि ते आजही सत्तेत आहेत. त्यांना मारल्यानंतर संघटन दबावात येईल, असे परंपरावाद्यांना वाटले. मात्र, आजही अंनिसचे वार्तापत्र सर्वात जास्त खपाचे नियतकालीक असल्याचे वारे म्हणाले.

जे दाभोळकरांच्या बाबतीत घडले तेच पानसरेंच्याही बाबतीत घडले. भलेही टोल माफियांच्या विरोधात पानसरे असल्याने त्यांचा खून करण्यात आला, असे सांगितले जात असले तरी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात त्यांच्या खुनाचे धागेदोरे सापडतात. नागपुरात हिंदुराष्ट्राची संकल्पना मांडणारे आहेत. मात्र, हिंदुराष्ट्राची संकल्पना विषमतेवर, शोषणावर आधारित आहे.  शिवाजीने निर्माण केलेली हिंदवी स्वराज्याची कल्पना ही समतेवर आधारित कशी होती. यावर पानसरे बोलत होते. त्यामुळे काहींच्या दुकानदाऱ्या बंद पडण्याच्या मार्गावर होत्या.

कलबुर्गीच्या बाबतीतही तोच प्रकार होता. कर्नाटकातील बसवेश्वरांनी वैदिकांशी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. मुळात त्यांचे नाव बसवण्णा! बाराव्या शतकावत बसवण्णांनी वैदिक परंपरेच्या विरोधात पुकारलेले बंड व त्याचे दाखले कलबुर्गी देत होते. त्यांनाही गोळ्या घालण्यात आल्या. सत्ताधाऱ्यांकडून या तिघांचेही खुनी पकडले जातील, याची अजिबात शाश्वती नाही. मात्र, त्यांचे काम आपल्याला पुढे न्यायचे आहे, असे वारे म्हणाले. खांडेकर यांनी संचालन केले.