दहा वर्षांनंतर जमिनीचे मोजमाप
प्रस्तावित वंजारीनगर जलकुंभ ते अजनी रेल्वे पुलापर्यंतच्या रस्त्याला आवश्यक जमिनीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रस्त्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यामुळे गेल्या दहा वर्षांपासून प्रस्तावित असलेला हा मार्ग प्रत्यक्षात येण्यास अद्याप बराच अवधी लागणार आहे.
तुकडोजी पुतळा चौकापासून अजनी रेल्वे स्थानकापर्यंत सरळ मार्ग करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे टी.बी. वॉर्ड, वंजारीनगर आणि रेल्वेमन्स स्कूलच्या परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी टाळता येणे शक्य आहे. शिवाय दक्षिण, पूर्व नागपुरातील नागरिकांना सोयीचे होणार आहे. यासाठी वंजारीनगर जलकुंभापासून अजनी रेल्वे पुलापर्यंत मध्य रेल्वेच्या परिसरातून ३० मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव २००५-२००६ पासून प्रलंबित आहे. महापौर प्रवीण दटके आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काही दिवसांपूर्वी भागाचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर महापालिकेने २८ ऑक्टोबर २०१५ ला भूमापन विभागाकडे मोजणी शुल्क जमा केले आहे. जमिनीच्या मोजमापाची तारीख मिळाली आहे. सध्या नकाशा, आखणीचे काम सुरू आहे. लवकरच जमिनीचे मोजपाप करण्यात येईल आणि त्यानंतर रेल्वेकडे रस्त्याचा प्रस्ताव सादर केला जाईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर म्हणाले.
दक्षिण आणि पूर्व नागपूरच्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेल्या या मार्गाची गेल्या ३० वर्षांपासून मागणी आहे. बहसंख्य जनतेच्या सोयीचे असलेतरी राजकीय फायदा-तोटा पाहून विषय रेटण्याची प्रवृत्ती असल्याने या मार्गाचे काम रेंगाळले आहे. तुकडोजी पुतळाकडून येणारी वाहतूक वंजारीनगरातून वळती करण्यात आली आहे. या मार्गाने रेल्वे वसाहतीला वळसा घेऊन टी.बी. वॉर्डात यावे लागते आणि त्यानंतर मेडिकल चौक किंवा अजनी पुलाकडे जावे लागते. या मार्गाला काटकोनात वळण घ्यावे लागत असल्याने वाहतुकीला अडथळा होता. यामुळे अजनी पूल ते वंजारीनगर असा थेट मार्ग होणे गरजेचे आहे. महापौरांनी या भागाला ३ ऑगस्ट २०१५ ला भेट दिली. आता रस्त्यांचे काम प्राथमिक पातळीवर का होईना सुरू झाले आहे.
याआधी या मार्गासाठी रेल्वे अधिकारी व महापालिका यांची संयुक्त बैठकीत चर्चा झाली होती. या रस्त्यांच्या आखणीप्रमाणे रेल्वेच्या केंद्रीय विद्यालयाच्या इमारतीला धोका निर्माण होत होता. त्यामुळे रेल्वेने रस्त्यांची आखणी बदलविण्याची विनंती केली. तत्कालिन महापालिका आयुक्तांनी विनंती मान्य केली आणि ती बदलण्यास मंजुरी दिली होती.
महापालिका ताजबागकडून येणारा ‘फिडर रोड’ वंजारीनगर जलकुंभ ते अजनी रेल्वेपुलापर्यंत ३० मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यासाठी जागेची मोजणी भूमापन विभागाकडून केली जात आहे.
जागेची मोजणी आणि रस्त्याचा आराखडा तयार केल्यानंतर मध्य रेल्वेकडे तसा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यामुळे रेल्वेने रस्त्याचा प्रस्ताव मान्य करणे आणि प्रत्यक्षात रस्ता तयार होण्यास अजून बराच अवधी लागण्याची चिन्हे आहेत.