* संतप्त नातेवाईकांचा आरोप   * हेल्थ सिटी रुग्णालयात गोंधळ

धंतोलीतील हेल्थ सिटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका दीड वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गोंधळ घातला. मोठय़ा संख्येने जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मेडिकलमध्ये हलवण्यात आला आहे. त्याच्या अहवालानंतरच मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल.

सुमारे १७ दिवसांपूर्वी त्रिमूर्तीनगर येथील दीड वर्षीय मुलीच्या अंगावर गरम पाणी पडले. पालकांनी उपचाराकरिता तिला हेल्थ सिटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी नातेवाईकांना मुलगी सुमारे १७ टक्के भाजली असून तिला संसर्ग होणार नाही म्हणून विशेष काळजी घेण्याचा विश्वास दिला. मुलीला त्रास होऊ नये म्हणून भुलीची लस देत तिच्यावर उपचार सुरू झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा हीच लस देत औषधोपचार सुरू झाला. मुलगी १७ दिवस दाखल असताना वारंवार तिला ही लस देऊन डॉक्टरांनी मुलीची काळजी घेतली नाही. त्या मुलीचा रविवारी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास रुग्णालय परिसरात गोंधळ घातला.

तणाव वाढल्याचे बघत रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलीस वेळीच घटनास्थळी पोहचल्यामुळे अनुचित प्रकार टळला. दरम्यान, नातेवाईकांनी मुलीचे शवविच्छेदन न करण्याची मागणी केली, परंतु रुग्णालय प्रशासन व पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाकरिता मेडिकलमध्ये हलवला. या मुलीच्या शवविच्छेदनानंतरच आता मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही, तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला.