१४१ वीज वाहिन्या उघडय़ावर; ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन फोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील ११ केव्हीच्या १३२ तर ३३ केव्हीच्या ९ अशा एकूण १४१ वीज वाहिन्या उघडय़ावर असून अनेकांची घरे वा दुकाने त्याला लागून आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना वीज तारांचा स्पर्श होऊन मृत्यू होण्याचा धोका आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार या वाहिन्या भूमिगत करण्याचा शब्द दिल्यावरही काम होत नाही, तेव्हा हे आश्वासन फोल ठरल्याचा आरोप नागपूरकरांकडून होऊ लागला आहे.

नागपुरात गेल्या काही दिवसांत उघडय़ावरील वीज तारांचा स्पर्श होऊन अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अलीकडेच सुगतनगर येथील जुळ्या भावांचा यामुळे मृत्यू झाला. त्यानंतर महावितरण व एसएनडीएलने धोकादायक व उघडय़ावरील भागातील वीज वाहिन्यांचे सर्वेक्षण केले. त्यात शहरातील मानकापूर, काटोल रोड, लष्करीबाग, गोविंद भवन, सेमिनरी हिल्स, नारा, कामठी रोड, मेयो, वर्धमाननगर, बिनाकी, रामबाग, मानेवाडा, न्यू सुभेदार, उमरेड रोड (सूतगिरणी), जुनी शुक्रवारी, एसटी बसस्थानक, भगवाननगर, नरेंद्रनगर, वाठोडा, जुना बगडगंज यासह इतर काही भागात सुमारे सव्वा लाख ग्राहक धोकादायक स्थितीत असल्याचे पुढे आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा असल्यामुळे नागपूरची वीज यंत्रणा सक्षम असणे अपेक्षित आहे, परंतु उघडय़ा वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. महावितरणने शहरातील तीन भाग एसएनडीएल या कंपनीकडे हस्तांतरित केले. या भागातही उघडय़ा वाहिन्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांना भूमिगत करण्याचा खर्च जास्त असल्यामुळे कंपनी हे काम करीत नाही. त्याकरिता महावितरण वा शासनाने निधी द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यंतरी भूमिगत वाहिन्यांकरिता एसएनडीएलला डीपीसीकडे प्रस्ताव देण्याची सूचना केली होती. प्रस्ताव देऊन सव्वा वर्षे लोटल्यावरही काही झाले नाही. पुन्हा आयपीडीएस योजनेअंतर्गत सुमारे २५ कोटींचा प्रस्ताव एसएनडीएलकडून घेतला गेला, परंतु त्यावरही पुढे काही झाले नाही. सुगतनगरच्या घटनेनंतर तेथील धोकादायक घरांना वीज कंपनीने नोटीस देत वाहिन्यांना लागून असलेल्या घरातील दारे व खिडक्या कायम बंद करण्यास सांगितले. शहरातील इतर भागातही या नोटीस केव्हा दिल्या जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

११ केव्हीच्या उघडय़ावरील वाहिन्या (टीप- कंसात वाहिन्यांची संख्या)

वायुसेनानगर (१), गोधनी (२), कोराडी (१), डब्ल्यूसीएल (१), एक्सप्रेस गोरेवाडा (१), वाडी (५), वैशालीनगर (१), सॉ मिल (१), कमाल चौक (१), पार्वती (२), बेझनबाग (३), किंग्जवे (३), काटोल रोड (सेमिनरी हिल्स) (१), फ्रेन्ड्स कॉलनी (१), गोरखेडे (१), तेलंखेडी (१), रिंग रोड (१), नारी व्हिलेज (१), टेका नाका (१), यशोधरा (२), अंसारनगर (१), मोमिनपुरा (१), वाठोडा बाजार (१), सोक्ता भवन (१), लाल इमली (१), चितार ओळी (१), हरीहर मंदिर (१), मस्कासाथ (१), गुलमोहर (१), एनएमएस (१), राजेश कास्टिंग (१), गोमती (१), भंडारा रोड (२), कावरापेठ (१), मेहंदीबाग (१), बिनाकी (१), तांडापेठ (१), लालगंज (१), कळमना गाव (१), दही बाजार (१), राजाबाक्षा (१), विश्वकर्मानगर (१), मेडिकल (१), शाहूनगर (१), ईएसआयसी (१), बेसा सुभेदार (१), सारडा चौक (१), दिघोरी (६), महालक्ष्मी (३), हुडकेश्वर (१), जानकीनगर (१), चिटणीसनगर (३), बगडगंज (१), दक्षिणामूर्ती (१), न्यू इंग्लिश (१), गणेशपेठ (१), महाल (२), संत्रा मार्केट (१), ग्रेट नाग रोड (१), नवभारत (१), घाट रोड (१), सेवासदन (१), सुभाष रोड (१), मॉडल मिल (१), बाबुलखेडा (१), भगवाननगर (१), विश्वकर्मानगर (१), ओंकारनगर (१), शताब्दी (१), नरेंद्रनगर (१), रेल्वे (१), जयदुर्गा (१), मानेवाडा (६), मॉडल मिल फिडर (४), महालगाव (६), अनमोलनगर (११), हिवरी (४), शास्त्रीनगर (२), हिवरी (१), बगडगंज (२), गांधीबाग औद्योगिक (३) सह इतर

३३ केव्हीच्या उघडय़ावरील वाहिन्या

अमरावती रोड (१), मानकापूर (१), नारा (३), चिंतेश्वर पारडी (१), बेसा ते कळमना (१), उप्पलवाडी (१), मेडिकल लाईन्स (१)