विधानसभेत सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल; केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे ६२ लाख रोख रक्कम कशासाठी?

देशातील काळ्या पैशांपैकी केवळ सहा टक्के रक्कम चलनी नोटांच्या स्वरूपात असताना केवळ त्या रद्द करून काळा पैसा कसा खणून काढणार, असा सवाल करीत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून सरकारवर विधानसभेत बुधवारी हल्लाबोल केला. जनतेला रोखविरहित व्यवहारांसाठी चालना दिली जात असताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे ६२ लाख रुपये, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी २२ लाख रुपये अशा रोख रकमा कशासाठी बाळगल्या आहेत, असा सवाल चव्हाण यांनी केला. नोटाबंदीमुळे देशातील १२५ कोटी जनतेचे प्रचंड हाल होत असल्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सरकारला धारेवर धरले.

[jwplayer JgPB5Ew2]

संसदेप्रमाणेच विधिमंडळातही नोटाबंदीविरोधात विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेनेही जनतेला त्रास भोगायला लागत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काळा पैसा खणून काढण्यासाठी व खोटय़ा नोटांना आळा घालण्यासाठी त्याचबरोबर दहशतवादी कारवायांचा अर्थपुरवठा रोखण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. मात्र जागतिक नाणेनिधीच्या अहवालानुसार काळा पैसा चलनी नोटांच्या स्वरूपात केवळ सहा टक्के आहे. तो खणून काढण्यासाठी नोटाबंदीचा अविचारी व दुराग्रही निर्णय कोणतीही पूर्वतयारी न करता लागू करून केंद्र सरकारने १०० कोटी जनतेला प्रचंड त्रास भोगायला लावला आहे. बराचसा काळा पैसा जमिनी, बांधकाम व्यवसाय, सोने, हिरे, कंपन्यांचे समभाग आणि देशाबाहेरील बँकांमध्ये आहे.

सरकारने अन्य स्वरूपात गुंतविलेला काळा पैसा खणून काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही, उलट दोन हजार रुपयांची नवी नोट चलनात आणून काळा पैसा साठवून ठेवणे अधिक सुलभ केले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आदी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय सरकारने घेतला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा लगेच रद्द करून २०० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची मागणी त्यांनी केली.  रोखविरहित व्यवहारांमध्ये मोठी वाढ होत आहे व त्याला चालना दिली पाहिजे. मात्र नोटाबंदी करून किंवा सक्तीने ते करणे चुकीचे आहे. नोटाबंदीमुळे ११ लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा झाले आहेत. अतिरेक्यांकडे दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा सापडल्या असून नवीन नोटांची नक्कल करून त्या चलनात आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे काही प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे काळा पैसा नष्ट करण्यासाठी घेतलेला हा निर्णय कुचकामी ठरेलच, पण दुराग्रहामुळे जनतेला मात्र हाल सहन करावे लागत असल्याची टीका चव्हाण यांनी केली.

पेटीएममध्ये चिनी कंपनीची आर्थिक गुंतवणूक असून त्यातील व्यवहार आणि डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठीही सरकारने पावले टाकणे आवश्यक असल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

जिल्हा बँकांवरचे र्निबध हटवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही नोटाबंदीवरून सरकारवर आगपाखड केली. काळा पैसा खणून काढलाच पाहिजे, पण नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. जिल्हा बँकांवरील र्निबधामुळे व्यवहार ठप्प असून शेतकरी जेरीला आला आहे. साखर कारखाने, दूध संघ आदी सहकारी संस्थांना शेतकऱ्यांना पैसे देता येत नाहीत. रब्बीचे उत्पादन व महसुलालाही फटका बसेल. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयामुळे विकासाला चालना मिळण्याऐवजी मंदीची व देश अधोगतीकडे जाण्याची भीती पवार यांनी व्यक्त केली. जनतेची सहनशक्ती संपत असून नियमबाह्य़ व्यवहार करणाऱ्या जिल्हा बँकांवर कारवाई करावी, रिझव्‍‌र्ह बँक व सरकारने अधिकारी नेमून व्यवहार तपासावेत, मात्र त्यांच्या कामकाजावरचे र्निबध उठवावेत, अशी मागणी पवार यांनी केली. बँकिंगसाठी परवाना दिला असताना र्निबध घालणे योग्य नसल्याची टीका त्यांनी केली.

पहिल्याच दिवशी सावंत यांना तंबी

नवनियुक्त विधान परिषद सदस्यांचा सभागृहातील आज पहिला दिवस होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वाचा सभागृहाला परिचय करून दिला. त्यानंतर लगेचच सभागृहात नोटाबंदीवरील चर्चेवरून गदारोळ सुरू झाला. विरोधकांच्या नोटबंदीला सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणावरील चर्चेचा आग्रह धरून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस नेते नारायण राणे बोलू लागले, मात्र त्याच वेळी सत्ताधारी बाकावरील सेनेचे नवनिर्वाचित सदस्य तानाजी सावंत यांनी जागेवरच बसून राणे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर टोकदार बोलण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी राणे संतापले, ‘‘प्रथम नियमांची माहिती करून घ्या, नंतर बोला,’’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. सभापती रामराजे निंबाळकर यांनीही सावंत यांना ‘‘आज तुमचा पहिला दिवस आहे, नीट नियमांची माहिती करून घ्या, नंतर बोला’’ अशा शब्दांत तंबी दिली.

*****

अच्छे दिनआणि गले की हड्डी

विधान परिषदेत नोटबंदीवरच्या चर्चेदरम्यान भाजपच्या ‘अच्छे दिन’ या आश्वासनाची तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात केलेल्या ‘गले ही हड्डी’ या वक्तव्याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना टोमणे मारले. निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणारे आता सत्तेत आल्यावर ‘अच्छे दिन’ आमच्या ‘गले की हड्डी’ झाली आहे, असे सांगत सुटले आहेत. ही हड्डी त्यांनी आता सामान्य जनतेच्या गळ्यात अडकविली आहे, असा आरोप त्यांनी केला. मुंडे यांनी त्यांच्या भाषणात नोटबंदी संदर्भात व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेला ‘ना चिठ्ठी ना कोई संदेश, लाइन मे लगाकर पुरा देश, तुम चले परदेश’ हा संदेशही वाचून दाखविला. त्याला विरोधी सदस्यांनी दाद दिली.

*****

राणे आणि संताप

पहिल्या दिवसापासून विधान परिषदेत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना टोकणे सुरूच आहे. राणे आणि संताप असे समीकरणच सभागृहात पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी नोटाबंदीवरील चर्चेचा आग्रह धरणाऱ्या राणे यांना शेकापचे जयंत पाटील यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याला राणेंनी संतापूनच ‘मध्ये बोलू नका’ असे सुनावले. तिसऱ्या दिवशीही याच मुद्दय़ावर त्यांना सत्ताधारी बाकावर टोकण्याचा प्रयत्न झाला, त्यालाही त्यांनी ‘राणे स्टाईल’ने उत्तर दिले. नोटाबंदी कोणत्या नियमानुसार घ्यायची यावर सभागृहात वादंग सुरू असताना उपसभापतींनी यासंदर्भात सभापतींच्या दालनात चर्चा सुरू असल्याची माहिती सभागृहाला दिली, ‘जे काही करायचे ते सभागृहात करा, ते सर्वोच्च आहे,’ असे राणे यांनी सांगितले.

*****

सभागृहात कांद्याच्या माळा

नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना बसलेला फटका याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी कांद्याच्या माळा आणल्या होत्या. या मुद्दय़ावर धनंजय मुंडे यांचे भाषण सुरू होते. त्यांनी कांदा उत्पादकांचा प्रश्न लावून धरला असतानाच दोन सदस्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या कांद्याच्या माळा बाहेर काढल्या. सभापतींनी त्यांना त्या बाहेर नेण्यास सांगितले.

[jwplayer VRpN0AK0]