लग्न समारंभ, पाटर्य़ाची वाहने रस्त्यावर उभी; नागरिकांना प्रचंड मन:स्ताप

शहरातील बडय़ा हॉटेल मालकांनी वाहनतळाच्या जागेचा गैरवापर करून त्या ठिकाणी सभागृह निर्माण केल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही हॉटेलमध्ये वाहने ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नसताना नुसताच बडेजाव केला जात आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्येचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसतो. अशा हॉटेलमधील कार्यक्रमांना मंत्री, खासदार, आमदार आदी व्हीआयपी उपस्थित राहात असल्याने वाहतूक पोलिसांचीही पंचाईत होते, हे येथे विशेष.

शहराची भौगोलिक स्थिती हॉटेल आणि दळणवळण व्यवसायाकरिता उपयुक्त असल्याने दिवसेंदिवस नागपुरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परिषदा येथे होतात. देशाच्या विविध भागांमध्ये जाण्याकरिता हजारो लोक नागपुरात जातात. याकरिता नागपुरात त्यांना थांबावे लागते, हा विचार करूनच हॉटेल व्यवसायाला येथे चालना मिळत आहे. शहराचा विकासही झपाटय़ाने होत असल्याने हॉटेलिंगच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. हॉटेलिंगच्या व्यवसायातील अनेक मोठय़ा समूहांनी नागपुरात हॉटेल उभारले आहेत. यात रॅडिसन ब्ल्यू, लि-मेरेडियन, सन अ‍ॅण्ड सॅन्ड, प्राईड ग्रुप ऑफ हॉटेल्स, सेंटर पॉईंट ग्रुप ऑफ हॉटेल्स, ओरिएन्ट ग्रुप आदींचा समावेश आहे. याशिवाय अनेक छोटय़ा-मोठय़ा उद्योजकांनी हॉटेलचा व्यवसाय थाटला आहे.

मात्र, अनेकांनी नियम धाब्यावर बसवून हॉटेलचा व्यवसाय चालविला असल्याची बाब पोलीस विभागाकडून प्राप्त माहितीवरून उघड झाली आहे. वर्धा मार्गावरील हॉटेल प्राईड, हॉटेल हरमिटेज, लेजेंड इन वेअर बिअर बार, शिवानी बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंट, राजीवनगर येथे पार्किंगची सुविधा नाही. याशिवाय मेडिकल चौक परिसरातील सत्य बार, गणगौर रेस्टॉरंट, हल्दीराम रेस्टॉरंट, संगम रेस्टॉरंट, भंडारा मार्गावरील जानकी बिअर बार, पुनापूर मार्गावरील काजल बिअर बार, भरतनगर येथील सत्या बिअर बार या ठिकाणी पार्किंगची सुविधा नसून त्यांना वाहतूक पोलीस विभागाने नोटीसही बजावली आहे. या हॉटेलमध्ये येणारे प्रत्येक वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले जाते. अनेकदा वाहनांची पार्किंग दोन चरांमध्ये होत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. याचा मन:स्ताप नागरिकांना सहन करावा लागतो. ही परिस्थिती बदेलल का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

सेंटर पॉईंट, तुलीमध्ये नियमित वाहतूक कोंडी

रामदासपेठ परिसरातील हॉटेल सेंटर पॉईंट, तुली इम्पेरिअल आणि सदर येथील तुली इंटरनॅशनल हॉटेल्समध्ये पार्किंगची जागा दाखविण्यात आली आहे. मात्र, एकूण जागेपैकी अध्र्यापेक्षा अधिक जागा ही इतर कामांकरिता वापरण्यात येते. तुली इम्पेरिअल हॉटेलमध्ये तर पार्किंगच्या जागेत लग्न समारंभाचे सभागृह निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे हॉटेलात थांबणाऱ्यांची वाहने आणि विविध समारंभाला येणारी वाहने हॉटेलच्या सभोवताल असलेल्या रस्त्यांच्या कडेला पार्किंग करतात. शिवाय लग्नसमारंभ असल्यास रस्त्यावरून नवरदेवाची वरात काढण्यात येते आणि हॉटेल कर्मचारीही पाहुण्यांना उतरेपर्यंत नागरिकांची वाहने थांबवून ठेवतात. यासंदर्भात रामदासपेठ परिसरात कार्यालय असणारे कर्मचारी विकास मरकडेय आणि सदर परिसरातील रहिवासी कलिम पठाण यांनी सांगितले की, हा रोजचाच प्रकार आहे. वाहतूक पोलिसांना वेळोवेळी माहिती देण्यात येते, परंतु अनेकदा कार्यक्रमांना मंत्री, खासदार आणि आमदार असल्याने पोलिसांचेही हात बांधले असतात. मात्र, हा प्रकार कधीतरी थांबायला हवा, अशी प्रतिक्रिया मरकडेय यांनी व्यक्त केली.

माहिती मिळताच कारवाई

सध्या शहरात मेट्रो आणि सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे बहुतांश रस्त्यांवर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. तरीही पार्किंगची सुविधा नसलेल्या हॉटेल्सना वाहतूक पोलिसांनी नोटीस बजावली असून कारवाईचा इशारा दिला आहे. याशिवाय ज्या हॉटेलमध्ये पार्किंगच्या जागेचा गैरवापर होत असल्यास महापालिकेच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

– संजय खांडेकर,

पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग.