वर्षभरातील पाचवा संप, पुन्हा नोटीस; महापालिकेकडून कोणतीच कारवाई नाही

बसेसची अपुरी संख्या, सुमार दर्जा यामुळे महापालिकेच्या स्टार बस सेवेवर आधीपासूनच नाराज असलेले नागपूरकर शनिवारी बस कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या संपामुळे अधिक संतापले आहेत. ऑटोचालकांशी त्यांचा वाद झाला असला तरी त्यात प्रवाशांची चूक काय, त्यांना भरुदड का? असा सवाल करीत नागपूरकर जनतेने महापालिका प्रशासन स्टार व्यवस्थापनाबाबत घेत असलेल्या नरमाईच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरातील हा पाचवा संप आहे, हे येथे उल्लेखनीय. एकीकडे स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्याचे स्वप्न दाखविले जात असतानाच दुसरीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याने नागरिक नाराज आहेत.

ऑटो चालकांशी वाद झाल्याने शनिवारी स्टार बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारून बसेस बंद ठेवल्या. त्याचा प्रचंड त्रास प्रवास करणाऱ्यांना झाला. महापालिकेने तातडीने यावर तोडगा काढणे अपेक्षित असतानाही केवळ हातावर हात ठेवून यंत्रणा बसली होती. शहर बस सेवा ही नागरिकांच्या हिताची असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी वारंवार होणाऱ्या संपामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

रविवारी सायंकाळी पुन्हा एका चालकाला मारहाण केल्याची घटना शहरात घडली. मात्र त्यावेळी संप पुकारला नसला तरी आज स्टार बसचालकांनी सुरक्षेच्या प्रश्नावरून महापालिका प्रशासनाला आणि वंश निमय कंपनीला संपाची नोटीस दिली आहे.

नागपूर महापालिकेची शहर बससेवा, नागपूर महानगर परिवहन लिमिटेड आणि बससेवेचे कंत्राट मिळालेल्या वंश निमय इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीबद्दल गेल्या काही दिवसात नागरिकांच्या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून यावरून महापालिकेतील वातावरणही तापत चालले आहे. बसेसची थकबाकी, नादुरुस्त बसेस, वेळापत्रकाची अनियमितता, खराब व नादुरुस्त बसेस बळजबरीने चालविण्याचा अट्टाहास यापायी शहर बससेवा यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना महापालिका प्रशासनाने त्या संदर्भात कुठलीच कारवाई केली नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेसोबत स्टार बसचा दर्जा, बसेससाठी पार्किंगची सुविधा नसल्यामुळे वाटेल त्या मार्गावर बसेस उभ्या करणे, स्टार बस पार्किंगच्या जागेवर ऑटो चालकांचे होणारे अतिक्रमण आणि त्यांची मनमानी यावरून यापुढे दोघांमध्ये मारामारीचे प्रकार घडतील, वाहन चालक किंवा ऑटोचालक त्यावरून वारंवार संप पुकारतील आणि त्याचा त्रास मात्र सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना होईल. आता तर शहरात ५० ग्रीन बसेस येणार आहेत. शिवाय १०० स्टार बसेस येत आहेत. त्यामुळे खासगी वाहन चालकांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता बघता त्यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. मात्र या सर्वावर महापालिका प्रशासन आणि पोलीस विभाग यावर काही तोडगा काढणार की नाही, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.

शहर बस चालक आणि ऑटोचालक यांच्यामधील हाणामारीच्या प्रकरणाची महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. शहर बससाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्थेवर ऑटो चालकांचे अतिक्रमण वाढले असताना वाहतूक पोलीस विभागाने त्यावर कारवाई करण्याची गरज आहे. संपामुळे नागरिकांना होणारा त्रास बघता स्टार बस चालकांच्या संदर्भात काही तरी तोडगा काढू आणि वारंवार असे जर संप होऊन नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असेल, त्यासंदर्भात वंश निमय कंपनीवर कारवाई करावी लागली तर ती सुद्धा करण्यात येईल.

– नरेंद्र बोरकर, सभापती, परिवहन समिती, महापालिका