वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलाचा परिणाम

ऊन, पाऊस, थंडी अशा वातावरणातील वारंवार उद्भवणारे बदल आणि प्रदूषण यामुळे डोळ्यांच्या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत. नागपूरच्या मेडिकल, मेयोसह विविध खासगी दवाखान्यांमध्ये उपचाराला येणाऱ्या एकूण रुग्णांमध्ये २०० हून जास्त रुग्ण हे डोळ्यात संसर्ग असल्याचे आढळून येत आहेत. ऑक्टोबरमध्ये डोळ्यांच्या संसर्गाला कारणीभूत ठरणाऱ्या जंतूचे प्रमाण वाढण्याचाही हा परिणाम असल्याची शक्यता नेत्ररोग तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण अशी शहरात रोज बदलती स्थिती दिसते. गेल्या काही दिवसांमध्ये शहराच्या काही भागात अधूनमधून पाऊस पडला. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून सर्वत्र दमट वातावरण आहे. असे वातावरण या जंतूंच्या प्रसाराला पोषक असते. त्यामुळे त्यांची वाढही झपाटय़ाने होते. परिणामी, शहरात डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण वाढले आहेत. डोळे येणे, बुब्बुळावर अल्सर, डोळे कोरडे पडणे, डोळ्यात खुपल्यासारखे वाटणे, डोळ्यातून वारंवार पाणी येणे अशी तक्रार घेऊन हे रुग्ण नेत्ररोग तज्ज्ञांकडे जात आहेत.

मेडिकलच्या नेत्ररोग विभागात उपचाराला येणाऱ्या एकूण २५० ते ३०० रुग्णांमध्ये १० ते २० रुग्ण हे डोळ्याला संसर्ग झालेले आढळतात. मेयो, डागा शासकीय स्मृती महिला रुग्णालयातील नेत्र विभाग आणि सुमारे ५०० खासगी रुग्णालये व दवाखान्यांमध्ये हीच स्थिती आहे. सर्वत्र डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण वाढत असतानाही नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आजार नियंत्रणासाठी फारसे उपाय होताना दिसत नाही. हा आजार नियंत्रणात राहण्यासाठी सर्वत्र स्वच्छता राखणे आवश्यक आहे. स्वच्छतेसाठी महापालिकेने तातडीने कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरज आहे. महापालिका या कामी केव्हा लक्ष देईल, याकडेच आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. शहरात दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. त्यामुळे निर्माण झालेल्या हवेतील प्रदूषणामुळे शहरात डोळ्यांशी संबंधित विविध आजाराचे रुग्ण वाढले. विविध कारणांनी कमी होत चाललेली रोगप्रतिकारक शक्तीही आजाराला निमंत्रण देणारी ठरते. बुब्बुळाला संसर्ग झाल्यावर योग्य काळजी न घेतल्यास प्रसंगी रुग्णाची दृष्टीही जाण्याचा धोका नेत्ररोग तज्ज्ञ व्यक्त करतात.

एसी, संगणकाचाही डोळ्यावर परिणाम

ऑक्टोबर महिन्यात शहरात दमट वातावरण असतानाच वातानुकूल यंत्राच्या जवळ बसणे, संगणकावर जास्त वेळ काम करणे, वाहन चालवताना डोळे उघडे राहिल्यामुळे डोळे कोरडे पडण्याचा नागरिकांना त्रास वाढत आहे. हा त्रास टाळण्यासाठी या साधनांचा वापर शक्य तितका कमी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून रुग्णांना दिला जात आहे.

काळजी घ्या, आजार टाळा

ऑक्टोबर महिन्यात मेडिकलसह शहरातील सर्व नेत्ररोग तज्ज्ञांकडे डोळ्यांना संसर्ग असलेले सुमारे २०० नवीन रुग्ण आढळत असून त्यांच्यावर उपचार होत आहे. या रुग्णांसह हा आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने ‘अ’ जीवनसत्व असलेला आहार घेणे, मद्य व तंबाखूचे व्यसन टाळणे, एसी, संगणकाचा शक्य तेवढा कमी वापर करणे, दिवासातून ४ ते ५ वेळा स्वच्छ पाण्याने डोळे धुणे अशाप्रकारे काळजी घेण्याची गरज आहे. डोळ्याला थोडाही त्रास जाणवताच रुग्णाने मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांसह इतर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास मोठे दुष्परिणाम टाळणे शक्य आहे.

– प्रा. डॉ. अशोक मदान, विभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग (मेडिकल), नागपूर