सोने, चांदीच्या भावात वाढ असतानाही ग्राहकांचा ओघ कायम 

धनत्रयोदशीला सोने खरेदी केल्याने समृद्धीत वाढ होते अशी परंपरा असल्याने लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी धनत्रयोदशीला शहरातील सराफा बाजारात सोन खरेदीसाठी ग्राहकांनी चांगलीच गर्दी दिसून आली. सोने, चांदीच्या भावात वाढ झाली असली तरी ग्राहकांचा ओघ कायम होता.

अनेकजण या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करतात. शुक्रवारी सोन्या चांदीच्या भावात वाढ दिसून आल्याने ग्राहकाला ज्यादा पसे मोजावे लागले असले तरी सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. शुक्रवारी सोने ३० हजार ६५० प्रतिग्रॅम तर चांदी ४३ हजार २०० प्रतिकिलोग्रॅम असे दर होते. सणासुदीच्या दिवसात सोने मोठय़ा प्रमाणात खरेदी केले जात असल्याने सुवर्णकारही वैविध्यपूर्ण दागिन्यांसह सज्ज झाले होते. नेकलेस, आंगठी, तोडे, पाटल्या, बांगडय़ा, चपलेहार, कर्णफुले, मोहनमाळ, साखळी खरेदीसाठी महिलांची विशेष गर्दी दुकानांमध्ये होती. नागपुरात सराफा बाजार असला तरी शहराच्या विविध भागात असलेल्या सोने,चांदीच्या छोटय़ा दुकानांमध्येही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. सोन्याचे नाणे किंवा छोटय़ा स्वरूपाचे दागिने खरेदी करणाऱ्यांची झुंबड दुकानांमध्ये होती. धनत्रयोदशीनिमित्त सुवर्णकारांनीही विविध योजना जाहीर करून ग्राहकांना आकर्षित केले.

ईएमआयला प्रतिसाद

धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केली. वर्षांच्या इतर दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी सोन्याचा भाव जास्त असणार हे माहीत असूनही दुकानांमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. सोने, चांदी खरेदीसाठी अनेक व्यापाऱ्यांनी ग्राहकांसाठी ‘ईएमआय’ पद्धत लागू केल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ एक हजार रुपये भरून सोन्याचे नाणे आणि छोटे दागिने विकत घेता येत असल्याने अनेकांनी त्याची खरेदी केली.

कोटय़वधींची उलाढाल

यंदा नागपूरच्या सराफा बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाला. सोने महाग असले तरी सकाळपासूनच ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी केली. ग्राहकांची हीच झुंबड दिवाळीपर्यंत राहणार आहे. सराफा बाजारात कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाली आहे. खऱ्या अर्थाने आपल्याकडे नवरात्री पासूनच सोने खरेदीला प्रारंभ होतो. मात्र, सोने खरेदीला धनत्रयोदशीहा साडेतीन मुहूर्तापकी एक असल्याने या दिवशी खरेदीला उधान असते.

पुरुषोत्तम कावळे, अध्यक्ष, महाराष्ट्र सराफा सुवर्णकार मंडळ.