व्यापाऱ्याकडून दहा हजारांची मागणी

चोराचे ‘टॉवर लोकेशन’ काढण्याकरिता दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. भूपेंद्र ओमप्रकाश सनोडिया (३३) रा. रजा टाऊन, हनुमान मंदिरजवळ, कामठी रोड असे आरोपीचे नाव आहे. भूपेंद्र हा परिमंडळ-३ पोलीस उपायुक्त कार्यालयातील सायबर सेलमध्ये कार्यरत आहे.

अडवानी ढाब्याचे मालक आणि दारू व्यवसायी विष्णू अडवानी यांच्या घरी २८ एप्रिलला ५० लाखांची चोरी झाली होती. या चोरीत त्यांच्यात घरातील नोकराचा हात असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी शरद तुळशीराम अडकिने (२८) रा. चिंचोली, धामनगाव याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ३६ लाख रुपये जप्त केले. तर उर्वरित १४ लाख रुपये त्याच्या साथीदाराकडे असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, त्याच्या शोध घेण्यासाठी त्याच्या मोबाईलवरून त्याचे ‘टॉवर लोकेशन’ काढण्यात येत आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक खुशाल तिजारे करीत आहेत. मात्र, टॉवर लोकेशन काढण्याची जबाबदारी असणारा आरोपी सनोडिया याने अडवानी यांच्याशी संपर्क करून पैशाची मागणी केली. त्यामुळे त्यांनी यापूर्वी त्याला ६ हजार रुपये दिले. मात्र, तो पुन्हा एक हार्डडिस्क, डाटा केबल आणि १० हजार रुपयांची मागणी केली. यावेळी त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. शनिवारी दुपारी त्याने आपल्या कार्यालयात ४ हजार ४०० रुपये किंमतीची हार्डडिस्क आणि १० हजार रुपये स्वीकारले. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले.