• पर्यावरणतज्ज्ञ कौस्तुभ चटर्जी यांचे प्रतिपादन
  • लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी काही मानके असतात. त्या मानकांच्या आधारावरच प्रदूषणाची पातळी मोजली जाते. केवळ एक आणि दोन मानकांच्या आधारावर प्रदूषणाची पातळी ठरवता येत नाही. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नागपूरने अजूनपर्यंत तरी हवेतील प्रदूषणाचा घटक असलेल्या ‘ऑक्साईट्स ऑफ नायट्रोजन’ची पातळी एकदाही ओलांडलेली नाही. याउलट इतर शहरांनी ‘पार्टीकुलेट मॅटर’ व ‘ऑक्साईट्स ऑफ नायट्रोजन’ हे दोन्ही प्रदूषणाचे घटक ओलांडले आहेत. त्यामुळे केवळ दोन मानकांच्या भरवशावर शहरातील हवा प्रदूषित आणि आरोग्याला हानीकारक आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे प्रतिपादन पर्यावरणतज्ज्ञ, ग्रीन विजिलचे कौस्तुभ चटर्जी यांनी केले.

केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्री अनिल दवे यांनी नुकतेच नवी दिल्ली येथे राज्यातील १७ शहरांमधील हवेत ‘पार्टिकुलेट मॅटर’ या प्रदूषित घटकाचे प्रमाण निश्चित पातळीपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. तसेच ‘ऑक्साईटस ऑफ नायट्रोजन’ याही प्रदूषक घटकाची पातळी प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे सांगितले. याकरिता त्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणातून आलेल्या अहवालाचा आधार घेतला. या पाश्र्वभूमीवर पर्यावरणतज्ज्ञ कौस्तुभ चटर्जी यांनी लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या भेटीत एकूणच प्रदूषणावर, त्याच्या परिणामांवर, घटकांवर आणि मानकावर भाष्य केले.

प्रदूषित शहरांमध्ये नागपूरच्या समावेशावर त्यांनी आक्षेप घेतला. हवेतील प्रदूषण मोजायचे असेल तर त्याची १२ मानके असतात आणि ही मानके केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेच ठरवलेली आहेत. येथे केवळ दोनच मानकांवर १७ शहरांतील हवेवर प्रदूषणाचा ठपका ठेवण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल पाहिला तर नागपूर शहरातील हवेतील ‘पार्टीकुलेट मॅटर’ हे १००-१५०च्या वर गेलेले नाही. त्याचवेळी मुंबई, पुणे, कोल्हापूर, चंद्रपूर यासारख्या शहरांमध्ये मात्र ते २५०-३००च्या आसपास आहे. याचाच अर्थ नागपूर शहराने एकदाही ‘पार्टीकुलेट मॅटर’ ओलांडले नाही. त्यामुळे नागपूरची हवा प्रदूषित आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण २४ तासात हवेतील ‘पार्टीकुलेट मॅटर’ १०० मायक्रोग्रॅम पर मीटरपेक्षा अधिक आणि संपूर्ण वर्षांत ते सरासरी ६० मायक्रोग्रॅम पर मीटरपेक्षा अधिक असेल तर हवा प्रदूषित आहे असे म्हणता येईल. त्याचवेळी ‘ऑक्साईट्स ऑफ नायट्रोजन’चे प्रमाण ८० पेक्षा अधिक असेल तर हवेत प्रदूषण आहे असे म्हणता येईल. नागपूर शहराने एकदाही हे प्रमाण ओलांडले नाही. मुंबई, पुणे, चंद्रपूर या शहरात मात्र हे प्रमाण कधीचेच ओलांडले आहे. अशा परिस्थितीत नागपूरची हवा प्रदूषित कशी म्हणता येईल, असा प्रश्न चटर्जी यांनी उपस्थित केला.

केवळ एका घटकावरून ठपका ठेवणे अयोग्य

कुठल्याही एका घटकावरून त्या संपूर्ण शहरावर प्रदूषणाचा ठपका ठेवणे योग्य नाही. कारण हवा, पाणी, माती, ध्वनी, घनकचरा यातही प्रदूषण होत असते. याशिवाय प्रदूषण मापनाची सर्व मापके तपासावी लागतात. या सर्व गोष्टी जेव्हा एखाद्या शहरात प्रदूषित आढळतात तेव्हा त्या शहरावर प्रदूषणाचा ठपका ठेवता येतो.

हिरवळीमुळे प्रदूषणाची पातळी ओलांडलेली नाही

हवेतील प्रदूषणासाठी जिवाश्म इंधन, वाहनांमुळे होणारे उत्सर्जन, औष्णिक वीज केंद्र, उद्योगांमधून होणारे उत्सर्जन, बांधकाम, कच्चे रस्ते, आग, कचरा जाळणे, जंगलाला लागलेली आग आदी घटक कारणीभूत ठरतात. या शहरात सध्याच्या स्थितीत हवा प्रदूषणासाठी वाहने कारणीभूत ठरू शकतात. विकासाच्या वाटेवर शहर असल्याने मेट्रो आणि रस्त्यांची कामे शहरात सुरू आहेत. मात्र, शहरातील हिरवळीमुळे हवेतील प्रदूषणाची पातळी अद्याप ओलांडलेली नाही. हवेला प्रदूषित करणारे मोठे उद्योग वा कारखाने शहराच्या परिसरात नाहीत.

कोणाचा अहवाल नेमका खरा ?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘महाराष्ट्र एन्वायरो पॉवर’ने तयार करून दिलेला नागपूर महानगरपालिकेचा पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल यात मोठी तफावत आहे. त्यामुळे कोणाचा अहवाल नेमका खरा आहे, हाही एक प्रश्न आहे. सल्फर डायऑक्साईड दोन्ही अहवालात वेगवेगळे दाखवत आहेत. मंडळाच्या अहवालात ९ ते १२ च्यादरम्यान दाखवत आहेत. त्याचवेळी महानगरपालिकेच्या अहवालात ते ६०च्या आसपास दाखवत आहेत. त्याचवेळी चंद्रपूर शहरातसुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात ते प्रत्येक दिवशी चारच दाखवत आहेत. प्रदूषण मापनाची प्रत्येकाची मानके अशी वेगवेगळी असतील आणि असा वेगवेगळा अहवाल असेल तर प्रदूषणाची पातळी ठरवायची कशी?