शहरातील तलावांमध्ये प्राणवायूच कमी .. तर तलावच मृतप्राय होण्याचा धोका
तलावातील पाण्यात जलपर्णी वनस्पतींचे आक्रमण, त्यातच टाकल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे तलावातील पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे. ज्या तलावात प्राणवायूचे प्रमाण चांगले आहे त्यात केवळ ४० टक्केच पाणी आहे. शहरातील तलाव गणपती विसर्जनासाठी तयार नाहीत आणि दुसऱ्या पर्यायावर प्रशासनाची अद्याप तयारी नाही, त्यामुळे यंदा बाप्पाला तलावातील डुबकीवर टांगती तलवार असणार आहे.
सलग चार वषार्ंपासून अमेरिकेतील जागतिक जलसंस्थेच्या सहाय्याने ग्रीन विजिल फाऊंडेशन शहरातील तलावाच्या पाण्याची चाचणी करीत आहे. अमेरिकेतील या संस्थेच्या वतीने चार पातळ्यांवर पाण्याची चाचणी केली जाते. यात पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण, पाण्याचे तापमान या बाबींचा समावेश आहे. गणेशोत्सव आणि देवी उत्सवाच्या आधी आणि नंतर, अशी चारदा ही चाचणी केली जाते. यंदाही शहरातील सोनेगाव, फुटाळा आणि गांधीसागर तलावातील पाण्याची चाचणी फाऊंडेशनने केल्यावर शहरातील तलाव गणेश विसर्जनासाठी तयार नसल्याची बाब समोर आली. सोनेगाव तलावातील प्राणवायूचे प्रमाण एका लिटरमागे पाच मिलिग्राम इतके, फुटाळा तलावात चार मिलिग्राम, तर गांधीसागर तलावात हेच प्रमाण साडेचार मिलिग्राम इतके होते. या तिन्ही तलावांमध्ये सोनेगाव तलावातील प्राणवायूचे प्रमाण बऱ्यापैकी असले तरीही या तलावात केवळ ४० टक्केच पाणी आहे. त्यामुळे येथे गणपती विसर्जन केल्यास तलावातील प्राणवायूच संपणारच नाही,, तर आहे तितकेही पाणी नंतर राहणार नाही, असे तथ्य समोर आले आहे.
फुटाळा तलाव तर अर्धाअधिक जलपर्णी वनस्पतींनी व्यापला आहे, तर गांधीसागर तलावाच्या कडा या कचरा आणि निर्माल्यांनी भरलेल्या आहेत. या परिस्थितीत शहरातील या तलावांमध्ये बाप्पा आणि नंतर देवी विसर्जन केल्यास तलाव मृतप्राय होतील. तलावातील पाण्याच्या प्राणवायूचे प्रमाण एका लिटरमागे दोन मिलिग्राम असेल, तर तलावातील जीवजंतूही जिवंत राहणार नाहीत, त्यामुळे तलाव जिवंत ठेवायचे असतील आणि तलावात मूर्ती विसर्जनही करायचे असेल तर गणेशोत्सवापूर्वी या तलावांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. अन्यथा, बाप्पाच्या विसर्जनावर टांगती तलवार असणार आहे.
जमीन खोदून आणि कार्पोलिन टाकून तयार केले जाणारे कृत्रिम तलाव हा तलाव सुरक्षित राखण्याचा एक चांगला पर्याय आहे. गेल्या वर्षी फुटाळा तलावावर फाऊंडेशनने प्रशासनाला या पद्धतीने दोन तलाव तयार करण्यास भाग पाडले होते. त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला. त्यामुळे यंदाही प्रशासनाने असे कृत्रिम तलाव चौकाचौकात उभारल्यास गणेश मंडळांनाही विसर्जन सोपे जाईल आणि तलावही सुरक्षित राखले जातील. फाऊंडेशनच्या को-ऑर्डिनेटर सुरभी जयस्वाल, दक्षा बोरकर व इतर पदाधिकारी तलावातील पाणी चाचणीत सहभागी होते.

हवेतील प्राणवायू तलावातील पाण्यात ओढून घेण्यासाठी लावले जाणारे कृत्रिम यंत्र आपल्याकडे नाही. तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी लावल्या जाणाऱ्या फवाऱ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात हवेतील प्राणवायू तलावातील पाण्यात ओढले जातो. मात्र, जे फवारे फुटाळा तलावात लावण्यात आलेले आहेत, ते बरेचदा बंद असतात, त्यामुळे बंद फवारे नियमित सुरू करण्याबरोबरच आणखी फवारे तलावांमध्ये लावल्यास या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण वाढवता येऊ शकते, असे प्रतिपादन ग्रीन विजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चटर्जी यांनी केले.