चिटणीस पार्क ते अयाचित मंदिर-जुनी शुक्रवारी; मध्य नागपुरातील रस्त्यांची अवस्था

मध्य नागपुरातील चिटणीस पार्क-अयाचित मंदिर-जुनी शुक्रवारी मार्गावरील डांबरी रस्त्यांची त्यावर खड्डय़ांमुळे वाईट अवस्था झाली आहे.

चिटणीस पार्क ते अयाचित मंदिर या मार्गाचे दोन वर्षांत तीनवेळा डांबरीकरण करण्यात आले. मात्र, तरीही अवस्था ‘जैसे थे’ आहे. मार्च महिन्यात ‘जेट-पॅचर’ने  खड्डे बुजविण्यात आले होते. पावसामुळे त्यातील डांबर बाहेर निघाले. डांबरी रस्त्यांवरील गिट्टी बाहेर आली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे रस्ते खड्डय़ांमध्ये हरवले आहे.

बडकस चौकात पं. बच्छराज व्यास पुतळ्याजवळ रस्ता उखडला आहे. याशिवाय संघ मुख्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरची सुद्धा अशीच अवस्था आहे. अयाचित मंदिर परिसर ते जुनी शुक्रवारी या भागातील रस्त्याची अवस्था दयनीय आहे. पूर्वी या भागात सिमेंटचा रस्ता होता. तो रस्ता खराब झाल्यानंतर डांबरीकरण करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांत चार वेळा डांबरीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतरही रस्ते उखडले कसे, असा प्रश्न निर्माण झाला.

झेंडा चौक ते गंगाबाई घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहे. सहा महिन्यांपासून रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. पावसाळ्याचे पाणी खड्डय़ात साचत असल्यामुळे लोकांना त्रास होतो. एका पावसाने खड्डे पडतील अशीच वरवरची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी केली जाते. त्याविरुद्ध ओरड झाली की पुन्हा निविदा काढली जाते आणि खड्डे बुजविण्याचे काम दिले जाते.

याची साखळीच महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. काम कसेही केले तरी अधिकाऱ्यांना कसे ‘खुष’ करायचे हे कंत्राटदारांना माहीत असल्यानेच नियोजित रकमेपेक्षा ३० टक्क्यांहून कमी दराने कंत्राटदार कामे घेतात. यावरून त्या कामाचा दर्जा कसा असेल याची कल्पना येते. दर्जा, गुणवत्ता तपासणारी यंत्रणा आणि सत्ताधारी कंत्राटदारांच्या अधीन असल्याने डांबरीकरणाचे, खड्डे बुजण्याचे निकष पाळले जात नाहीत. त्यामुळे चार-सहा महिन्यांत डांबरीकरणाचे बारा वाजतात आणि रस्त्यांवर खड्डे होतात आणि जनतेचे कोटय़वधी रुपये खड्डय़ात जातात आणि त्यांना खड्डय़ातून वाट काढण्याशिवाय पर्याय राहत नाही.

चिटणीस पार्क ते अयाचित मंदिर या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू आहे. बडकस चौकात खड्डे बुजविण्यात आले आहे. ज्या कंत्राटदारांकडे या रस्त्याची डांबरीकरणाची कामे देण्यात आली होती, त्यांना नोटीस देण्यात आली आहे आणि तेच या रस्त्यावरील खड्डे बुजविणार आहे. तोपर्यंत त्यांना पैसे दिले जाणार नाही.

अशोक पाटील, सहायक आयुक्त गांधीबाग झोन