घोटाळे उघड करून परस्परांवर मात करण्याचे प्रयत्न
भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत सत्तासंघर्षांतूनच शहरातील भूखंड गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस येऊ लागल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
महापालिकेचा भूखंड परस्पर विकणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांनी दिलेले आदेश आणि त्यानंतर काही दिवसातच कामठी पालिका उपाध्यक्षाविरुद्ध भूखंड हडपण्याच्या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे ही दोन उदाहरणे याबाबत दिली जात आहे. कामठी हा पालकमंत्र्यांचा मतदारसंघ आहे, हे येथे उल्लेखनीय.
तब्बल दीड दशकानंतर राज्यात सत्ता येऊन फक्त दीड वर्षच झाले असले तरी स्थानिक भाजपमध्ये मात्र सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. सध्या महापालिकेत सुरू असलेला पालकमंत्री विरुद्ध सत्ताधारी यांच्यातील धुसफुशीकडे याच अंगाने राजकीय वर्तुळात पाहिले जात आहे. पालकमंत्री म्हणून बावनकुळे यांनी महापालिकेच्या कामात आवश्यकतेपेक्षा अधिक लक्ष घालणे हे तेथील सत्ताधाऱ्यांना त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण वाटू लागले आहे, तर संपूर्ण जिल्ह्य़ाच्या पालकत्वाची जबाबदारी मंत्र्यावर असल्याने त्यात महापालिका व सुधार प्रन्यासचाही समावेश आहे, अशी पालकमंत्र्यांची भूमिका असून या माध्यमातून शहराच्या राजकारणावर वर्चस्व मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. यातून सुरू झालेले हेव्यादाव्याचे राजकारण आता गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. महापालिकेच्या जागेची परस्पर विक्री करणाऱ्या बिल्डरवर कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी देताच बुधवारी कामठी पालिकेचे उपाध्यक्ष रणजित साफेलकर यांचे भूखंड हडपण्याचे प्रकरण बाहेर आले. साफेलकर हे पालकमंत्र्यांच्या कामठी मतदारसंघातील आहेत. भाजपच्या सत्तासंघर्षांतून ही प्रकरणे बाहेर आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
महापालिका आणि पालकमंत्री यांच्यातील समन्वयाच्या संबंधात ठिणगी पडण्यासाठी पालकमंत्र्यांनी वेळोवेळी घेतलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचे निमित्त ठरले. यापैकी काही बैठकांमध्ये स्वपक्षीय सत्ता असलेल्या महापालिकेची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले. पाणी आरक्षणाच्या विषयावर झालेली बैठक हे त्यासाठी उदाहरण ठरावे. या बैठकीत महापालिकेला पाण्याचा हिशेब मागण्यात आला होता तसेच उन्हाळ्यात नागपुरातच पाणी टंचाई तीव्र होत असताना महापालिकेला शहरालगतच्या गावांना पाणी पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यासाठी सरकारी निर्णयाचा हवालाही देण्यात आला. ही बाब महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची नाराजी ओढवून घेणारी ठरली होती. याबाबत बाहेर चर्चा होऊ लागल्याने नाराज झालेल्या पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या महापालिकेच्या दोन कार्यक्रमाला (सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन) उपस्थित राहणे टाळले. ३०० कोटींच्या सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजनाचे शहरात तीन ठिकाणी कार्यक्रम होते. मुख्यमंत्री असल्याने या ठिकाणी पालकमंत्री म्हणून बावनकुळेंची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र ते फक्त एकाच (लॉ कॉलेज परिसर) कार्यक्रमाला उपस्थित होते. याच दिवशी त्यांनी जनता दरबार घेतला. मुख्यमंत्री शहरात असताना पालकमंत्र्यांनी वेगळा कार्यक्रम घेणे संकेत मोडणारे ठरते, असे भाजपच्या वर्तुळातून बोलले जात आहे.