अ‍ॅड.आंबेडकर यांची माहिती

महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांसह समविचारी समाजसेवी संघटनांना सोबत घेऊन भारिप-बमसं निवडणुका लढणार असल्याची माहिती भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीत भाजप वाटत असलेला पैसा लुटण्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

आगामी निवडणुकांमध्ये समाजासाठी कार्य करणाऱ्या संघटनांना सोबत घेऊन पक्षाच्या नावाने निवडणुका लढणार आहे. अकोला महापालिकेत पक्ष सर्व जागा लढणार आहे. येथील सत्ताधारी भाजप-सेनेमुळे शहराची बकाल अवस्था झाल्याची टीकाही त्यांनी केली. येथील भूमिगत गटात योजनेसाठी पाठपुरावा करून निधी खचून आणला होता. मात्र, विद्यमान खासदारांनी केंद्र व राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करून योजना नाकारली. तोच निधी एका मंत्र्यांने पळवल्याचा आरोप अ‍ॅड.आंबेडकर यांनी केला. अकोल्यात स्वच्छता हवी की अस्वच्छता, याचा विचार मतदारांनी करावा, असेही ते म्हणाले. भारिप-बमसं बहुमतात सत्तेत आल्यास बंदिस्त क्रीडांगण, खुल्या भूखंडावर सायंकाळी बाजारपेठ, मिनी बससेवा, नदीचे सौंदर्यीकरण, नियमित पाणीपुरवठा, झोपडपट्टी निर्मूलन आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीत पक्षाचा अधिकृत उमेदवार देण्यावर विचार सुरू आहे. यासंदर्भात येत्या दोन ते तीन दिवसात पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष आ.बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, प्रा.धर्यवर्धन पुंडकर, बालमुकूंद भिरड आदी उपस्थित होते.

मोदींनी म. गांधींची बरोबरी करू नये

महात्मा गांधींचे विशिष्ट स्थान असून, ते भारतात कायम राहणार आहे. महात्मा गांधींची लोकप्रियता अफाट आहे. त्या छायाचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींचे स्थान घेण्याचा प्रयत्न केला. मोदींनी महात्मा गांधींची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी दिला. त्या छायाचित्रामुळे मोदींवर नागरिकांमधून होणाऱ्या टीकेवरून त्यांनी आपले स्थान ओळखावे, असेही ते म्हणाले.