जिल्हाभर चर्चेत असलेल्या जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत प्रस्थापित पॅनलचा दणदणीत पराभव करीत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘जय हो’ पॅनलचे उमेदवार विजयी झाले. अध्यक्षपदी देवेंद्र शिदोळकर तर सरचिटणीसपदासाठी राजेंद्र ढोमणे विजयी झाले. त्यांनी अनुक्रमे ईश्वर बुधे व प्रमोद बेले या विद्यमान कार्यकारिणीतील उपाध्यक्ष व सरचिटणीस यांचा पराभव केला.
४९६ मतदारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २६० कर्मचाऱ्यांनी मतदान केले. यापैकी अध्यक्षपदी निवडून आलेले शिदोळकर यांना १८८ तर बुधे यांना ८८ मते मिळाली. याच फरकाने ढोमणे यांनी बेले यांचा पराभव केला. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सकाळी ९ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दोन नंतर निकाल जाहीर करण्यात आल्यावर विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला. प्रस्तापित कार्यकारिणीला पुन्हा निवडून येण्याचा भक्कम विश्वास होता. मात्र नव्याने एकजूट होऊन स्थापन केलेल्या ‘जय हो’ पॅनलने हा विश्वास धुळीस मिळविला. तीन वषार्ंसाठी ही कार्यकारिणी असून त्यानंतर पुन्हा निवडणूक होईल. ‘जय हो’ पॅनलने पेन्शन योजना आणि अनेक आश्वासने प्रचारा दरम्यान कर्मचाऱ्यांना दिली होती. त्याची प्रतिपूर्ती करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.
प्रस्थापित पॅनलचे अनेक मतदार मतदानासाठी आलेच नाही, त्याचा फटका त्यांना बसला. याउलट जय हो पॅनलने त्यांचे सर्व मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यात यश मिळविले व त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांवर वचक असणारी ही संघटना मानली जाते. बदल्या आणि सोयीच्या ठिकाणी नियुक्ती करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो. विद्यमान कार्यकारिणीतील कर्मचारी संघटनेच्या नेत्यांना अधिकाऱ्यांची ‘कमजोरी’ माहिती होती, त्यामुळे लढतीतील अनेक जण विजयी होऊ नये, असे अधिकाऱ्यांकडूनही प्रयत्न झाले. त्याचबरोबर विद्यमान कार्यकारिणीतील काही नेत्यांनीही विरोधकांना मदत केल्याची माहिती निवडणुकाच्या निकालातून दिसून आल्याचे स्पष्ट झाले.
निवडणूक अधिकारी म्हणून श्री. दगडे यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकोरी म्हणून नाना कडवे व सतीश जोशी यांनी काम पाहिले.