उपराजधानीतील बहुतांश खासगी रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात उपचारादरम्यान होणारे मृत्यू कमी दाखवण्याकरिता अजब क्लृप्ती अंगीकारली आहे. त्यानुसार हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात मेडिकल वा मेयो या दोनपैकी एका शासकीय रुग्णालयात नातेवाईकांना वेगवेगळे कारण देत घेऊन जाण्यास सांगितले जातात. या दोन्ही संस्थेत उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाल्यावर तो खासगी रुग्णालयाच्या नावाने न चढता शासकीय संस्थेच्या नावावर चढतो. त्यामुळे शासकीय जास्त तर खासगी रुग्णालयात कमी मृत्यू दिसत असल्याचे प्रकार एका अभ्यासात पुढे आले आहे.

मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून नागपूरच्या मेडिकल या रुग्णालयाची तर प्राचीन रुग्णालय म्हणून नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)ची ख्याती आहे.

दोन्ही शासकीय रुग्णालयांमध्ये विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील अनेक गंभीर रुग्ण रोज रात्री- बेरात्री उपचारासाठी येतात. मेडिकल, मेयो या दोन्ही संस्थेतील आपत्कालीन विभागासमोरच्या दारावरूनच खासगी रुग्णालयात तैनात दलाल या रुग्णांना रात्रीच्या वेळेला पळवतात. रामदासपेठ, सक्करदरा, मेडिकल चौक तसेच इतर भागातील खासगी रुग्णालयात दाखल करतात. या रुग्णांकडून खासगी रुग्णालये लाखो रुपये उपचारापोटी वसूल करतात.

मात्र, रुग्णाच्या नातेवाईकांजवळचे पैसे संपले किंवा रुग्णाचा जीव आता वाचणार नाही, हे लक्षात येताच खासगी रुग्णालयातील डॉक्टर पुन्हा मेडिकल, मेयोत या रुग्णाला नातेवाईकांना विविध कारणे देत घेऊन जाण्यास सांगण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे.

हा प्रकार निदर्शनात आल्याने त्यावर मेडिकल प्रशासनाच्या वतीने काम सुरू झाले आहे, परंतु अद्याप त्यात यश मिळाले नाही. मेडिकल, मेयोतील खासगी रुग्णालयातील दलालांवर कारवाईकरिता संस्था प्रशासनाकडून संबंधित पोलीस ठाण्यासह शहर पोलीस आयुक्तांसोबत बऱ्याचदा बैठका घेण्यात आल्या, परंतु काही दिवस कारवाईचा देखावा करून पुन्हा पोलिसांची गस्त कमी होते. तेव्हा दलाल पुन्हा सक्रिय होतात.

हा प्रकार पोलिसांचे दलालांशी साटेलोटे असल्याचा तर नाही ना? असा प्रश्न रुग्ण व त्यांचे नातेवाईक विचारत आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही बऱ्याचदा हा प्रश्न उपस्थित केला गेला, परंतु त्यावर फारसे काही झाले नसल्याने खासगी रुग्णालयाची मनमानी थांबवणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तीन वर्षांत १५ हजार मृत्यू

नागपूरच्या मेयो व मेडिकल या दोन्ही शासकीय रुग्णालयात गेल्या तीन वर्षांत उपचारादरम्यान १५ हजारांहून जास्त मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे.

त्यातील काही मृत्यू हे दोन्ही रुग्णालयातील कॅज्युल्टीत डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीचे आहे.  मेयोत २०१३ ला १९६१ मृत्यू, २०१४ ला २१४५, २०१५ ला १८३७ मृत्यू नोंदवण्यात आले. मेडिकलमध्ये याहून दुप्पटीच्या जवळपास मृत्यू झाले. हे जास्त मृत्यू दिसण्याचे कारण म्हणजे खासगीतून मृत्यूच्या दाढेतील रुग्ण शासकीय रुग्णालयात आल्याने झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मृत्यू प्रमाणपत्रासाठीही मेडिकलमध्ये प्रवेश

खासगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून नातेवाईकांना रुग्णाच्या मृत्यूनंतर शासकीय संस्थेतून मृत्यूचे प्रमाणपत्र मिळते असे सांगितले जाते. खासगी रुग्णालयातील मृत्यूपत्र मध्यप्रदेशात ग्राह्य़ धरले जाणार नाही, अशी जोड याप्रसंगी दिली जाते. केवळ शासकीय रुग्णालयातून मृत्यू प्रमाणपत्र मिळते, या कारणासाठी बिच्चारे विविध राज्यांतील नातेवाईक खासगी रुग्णालयात पैसा खर्च केल्यानंतर अखेरच्या क्षणी मेडिकलमध्ये घेऊन जात असल्याचे एक प्रकरण नुकतेच पुढे आले आहे, हे विशेष.