आरक्षणामुळे मागासवर्गीयांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैचारिक क्षेत्रात उत्थान झाले आहे. आरक्षण नसते तर आजच्याएवढी प्रगतीही ते गाठू शकले नसते. त्यामुळे खासगी क्षेत्रातील उद्योगांमध्येही आरक्षण हवे, असे प्रतिपादननवी दिल्लीतील भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्यावतीने वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आरक्षण परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रा. देवीदास घोडेस्वार, साहित्यिक हरी नरके, अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी ई. झेड खोब्रागडे होते.
डॉ. थोरात म्हणाले, आरक्षणामुळे मागासवर्गीयांना सर्वच क्षेत्रात थोडीफार ओळख मिळाली. खासगी क्षेत्रातही आरक्षणाची गरज आहे. कारण बहुतेक उद्योग हे उच्चभ्रू आणि उच्चवर्णीयांचे असतात. त्यांना आरक्षण नसले तरी सोयी सुविधा भरपूर असतात म्हणून ते पुढे जातात. मात्र, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसींना आरक्षणाशिवाय पुढे जाण्याचे मार्ग बंद असतात. त्यामुळे खासगी क्षेत्रातही आरक्षण हवे. निदान त्यामुळे त्यांना एक संधी उपलब्ध होते.
हरी नरके म्हणाले, मंडल आयोग ओबीसींच्या आरक्षणासाठी होते. मात्र, त्यासाठी दलितांनी संघर्ष, आंदोलने केली. ओबीसींमध्ये आरक्षणाविषयी फारशी जागृती नाही. त्यांनी एस.सी. एसटीच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणासाठी लढले पाहिजे. प्रा. देवीदास घोडेस्वार म्हणाले, आरक्षण गरिबातील गरीब, दलित, शोषितांचे जगणे अधिक सुकर करण्याचा मार्ग आहे. मात्र, आरक्षणाविषयी गैरसमज पसरवले जातात. सत्य दडपले जाते. त्यामुळे समाजासमाजात तेढ निर्माण होते. आरक्षणाच्या विरुद्ध प्रस्थापित वर्ग आंदोलन करून याबाबतचे सत्य न सांगता लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अध्यक्षीय भाषणात ई. झेड. खोब्रागडे म्हणाले, महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम ही आरक्षणाने लाभान्वित झालेल्या अधिकाऱ्यांची संघटना आहे. २००१ पासून ती समाजहिताच्या विविध प्रश्नांवर कार्यशाळा आयोजित करते. भारतीय संविधानाच मूलभूत अधिकार व हक्काशी निगडित मुद्दांवर सुद्धा कार्यक्रम घेतले जातात. आरक्षण हा संविधानिक हक्क आहे. अनुच्छेद १५ (४) व १६ (४) मध्ये आरक्षणाची तरतूद आहे. समाजातील शोषित, वंचित व उपेक्षित वर्गाला सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागासवर्गास आरक्षणाच्या तरतुदीमुळे विकासाची संधी मिळाली आहे. संचालन प्राचार्य सच्चिदानंद दारुंडे यांनी केले. प्रास्ताविक टी.बी. देवतळे यांनी केले. शिवदास वासे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले आणि विलास खुटे यांनी आभार मानले.