केंद्राच्या वन्यजीव गुन्हे शाखेसाठी काम करताना वन्यप्राण्यांच्या शिकारी, त्यांच्या अवयवांची होणारी तस्करी पाहून व्यथित झालेले कोलकात्यातील ४२ वर्षीय रथिंद्रनाथ दास यांनी आता शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी नवा पर्याय निवडला आहे. जोपर्यंत जंगल आणि वन्यजीवांप्रती लोकांमध्ये जागरुकता येणार नाही तोपर्यंत हा प्रकार थांबणार नाही, हे लक्षात घेऊन रथिंद्रनाथ यांनी मोटारसायकलवरून भारतभ्रमण सुरू केले आहे. या प्रवासादरम्यान ते रविवारी नागपुरात आल्यावर त्यांच्या भारतभ्रमणाची गाथा त्यांनी लोकसत्ताजवळ उलगडली.

गेल्या ८ ऑक्टोबर २०१६ ला ते कोलकात्यावरून निघाले. आतापर्यंत त्यांनी २९ राज्ये पालथी घातली असून महाराष्ट्र हे त्यांच्या भ्रमणमार्गातील ३० वे राज्य आहे. लक्षद्विप आणि अंदमान वगळता ३४ राज्यात जाऊन ते जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाचा संदेश देणार आहेत. प्रत्येक ३० ते ४० किलोमीटर अंतर पार केल्यानंतर जे शहर किंवा गाव लागेल, तेथे जाऊन ते गावकऱ्यांशी आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. वाघांना वाचवणारे अनेकजण आहेत, पण घराजवळच्या सापाला वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे. फुलपाखराला जपण्याचा प्रयत्न केला जातो, पण ड्रॅगनफ्लायला दोरा बांधून उडवला जातो. तेव्हा आपल्या आसपासची जैवविविधता, आपल्या आसपासचे वन्यजीव वाचवले तरच आपोआप जंगल वाचेल आणि पर्यावरणही वाचेल, असा संदेश ते विद्यार्थ्यांना देतात.

या दरम्यान वनाधिकाऱ्यांना ते फारसे भेटत नाहीत. कारण, त्यांच्याकडून सगळ्या सकारात्मक बाबीच कळणार, पण गावकऱ्यांकडून खरे ते जाणून घेता येते. गावकऱ्यांशी झालेल्या संवदातून आपल्यापेक्षाही त्यांना निसर्गाचे ज्ञान अधिक आहे. निसर्गाशी त्यांचे नाते अधिक घट्ट आहे. त्यामुळे निसर्ग वाचवताना त्यांच्याकडूनही बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्याचे रथिंद्रनाथ दास यांनी सांगितले. तब्बल १०० दिवसांचा त्यांचा प्रवास आटोपला असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात ते कोलकात्याला परततील.

घनकचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती

रथिंद्रनाथ दास हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून कोलकात्यातील हॉटेल्समधून निघणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून तयार झालेले खत ते नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. यातूनच त्यांचा गावकऱ्यांशी संबंध आला आणि मानव-वन्यजीव संघर्षांचा प्रश्न मोठा आहे, हे त्यांना जाणवले. त्याहीपेक्षा वन्यजीवांची शिकार आणि अवयवांची तस्करी मोठी असल्याचे जाणवले. त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलवरून भारत भ्रमण करण्याचे त्यांचे स्वप्न होते, पण त्या स्वप्नाला त्यांनी जंगल आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धनाच्या संदेशाची जोड दिली. त्यासाठी त्यांनी फेसबुकसारख्या समाजमाध्यमाचा आधार घेतला आणि भारतातील जंगले, आसपासची गावे आणि तेथे कसे जाता येईल, याची माहिती गोळा केली. त्यांच्या मित्रांनीही त्यांचा हा प्रवास आखताना संपूर्णपणे मदत केली. प्रामुख्याने भाषेच्या अडथळ्यावर कशी मात करायची, हेही त्यांनी शिकून घेतले.