रेडिओ कॉलर लावल्यानंतरही गेल्या दहा महिन्यांत दोन वाघांचा मृत्यू विद्युत प्रवाहाने झाल्यामुळे रेडिओ कॉलरींगच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमरेड करांडला अभयारण्यातील  ‘जय’ या वाघाला कॉलर लावली असताना त्याचा ठावठिकाणा लागला नाही. ‘जय’चा वंशज असलेल्या ‘श्रीनिवास’ या वाघालासुद्धा रेडिओ कॉलर असताना त्याचाही मृत्यू विद्युत प्रवाहाने झाला आणि आता ‘टी-२७’ या वाघिणीचा मृत्यूदेखील विद्युत प्रवाहाने झाला. त्यामुळे हे अपयश कॉलरिंग प्रणालीचे की प्रणाली हाताळणाऱ्या यंत्रणेचे यावर आता खलबते सुरू झाली आहेत.

ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील ‘टी-२७’ या वाघिणीला रेडिओ कॉलर लावून २९ जुलैला बोर अभयारण्यातील नवरगाव क्षेत्रात सोडण्यात आले होते. तेव्हापासून तिच्यावर देखरेख ठेवणारी आणि गावकऱ्यांना जागृत करणारी असे दोन चमू कार्यरत होते. कॉलरचे संकेत ठराविक कालावधीनंतर मिळत असतानासुद्धा देखरेख करणारा चमू सातत्त्याने तिच्या मागे होते. माणसांच्या मागोव्यामुळे ती पुढे पुढे गेली. अमरावती जिल्ह्यतून नागपूर जिल्ह्यतील नरखेड आणि नंतर कोंढाळीत आलेल्या या वाघिणीवर देखरेख करणारा चमू बदलला. त्यांनी वाघिणीचा मागोवा घेताना ठराविक अंतरावरूनच तिच्यावर पाळत ठेवली. परिणामी त्या चार दिवसात वाघिणीबाबत कोणताही गोंधळ झाला नाही. वर्धा जिल्ह्यत परतताच पुन्हा एकदा फटाके फोडून त्या वाघिणीला परतावण्याचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे नवरगावातून तिने काढता पाय घेतला आणि विद्युत प्रवाहाचा बळी ठरली. कॉलर लावल्यानंतर वाघिणीचा मृत्यू होत असेल तर त्याचेसुद्धा संकेत यंत्रावर येतात. त्यामुळे हा चमू नेमके काय करत होता, यावर प्रश्नचिन्ह आहे. ऑगस्ट महिन्यात गडचिरोली जिल्ह्यतील चपराळा अभयारण्यात आरमोरीची वाघीण रेडिओ कॉलर लावून सोडण्यात आली. या वाघिणीच्या सुटकेलासुद्धा दोन महिने होत आहेत, पण तिच्याबाबत गेल्या दोन महिन्यात कोणतीही अनुचित घटना घडली

नाही. सुरुवातीपासून चपराळा वनखात्याच्या देखरेख चमुने वाघिणीपासून अंतर राखले. मध्य चांदा विभागातील विठ्ठलवाडा, नंतर धाबा येथे वाघीण आल्यानंतर दोन चमू एकत्र आल्या. येथून ही वाघीण प्राणहिता, मध्यचांदा असा प्रवास करत गडचिरोली, चामोर्शी येथे पोहोचली. सध्या ही वाघीण घोट परिसरात आहे. वाघिणीच्या या संपूर्ण भ्रमंतीदरम्यान या परिसरातील गावांमध्ये विद्युत प्रवाहाचा धोका लक्षात घेऊन देखरेख चमूने रात्रीच्या वेळी गावातील वीज बंद ठेवण्याची विनंती विद्युत विभागाला केली. त्याचवेळी वाघिणीपासून सुरक्षित अंतर राखूनच हा चमू तिच्यावर पाळत ठेवून आहे.

गेल्या दहा महिन्यांत विद्युत प्रवाहामुळे तीन वाघ आणि दोन सांबर मृत्यमुखी पडले. नागपूर जिल्ह्यतील खापा वनक्षेत्रात जानेवारी २०१७ मध्ये वाघीण आणि दोन सांबर, चंद्रपूर जिल्ह्यतील नागभिडमध्ये रेडिओ कॉलर केलेला श्रीनिवास हा वाघ आणि आता कॉलर केलेली ‘टी-२७’ ही वाघीण विद्युत प्रवाहाचा बळी ठरली.

एकीकडे गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात कॉलर लावलेल्या वाघिणीबाबतचा प्रयोग यशस्वी होत असताना नागपूर जिल्ह्यत देखरेख करणाऱ्या चमुने वाघिणीमागे लावलेला घोषा तिच्या मृत्यूसाठी कुठेतरी कारणीभूत ठरला आहे. देखरेख ही नेहमी सुरक्षित अंतर ठेवूनच करायला हवी. या चमुने अजूनपर्यंत वाघिणीला पाहिलेले नाही. यंत्रावर वाघिणीचे ठिकाण गावाजवळ दिसल्यास लगेच गावकऱ्यांना ते जागृत करतात. ती पद्धती बोरमधल्या वाघिणीबाबत राबवली असती किंवा वरिष्ठांचा सल्ला घेतला असता तर वाघिणीच्या मृत्यूची वेळ आली नसती. देखरेख चमूची गफलत आणि अभ्यासाचा अभाव वाघिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. माणसांचा सहवास हा नेहमीच वन्यप्राण्यांच्या बदलणाऱ्या वर्तणुकीसाठी कारणीभूत ठरतो.

-डॉ. सुनील बावस्कर, प्रभारी अधिकारी, महाराजबाग प्राणिसंग्रहालय