आजवर संघाचे द्वितीय सरसंघचालक म्हणून गोळवलकर गुरुजी यांचेच नाव घेणाऱ्या संघाने गुरुवारी प्रथमच गोळवलकर गुरूजी नव्हे, तर डॉ. लक्ष्मणराव परांजपे हे संघाचे द्वितीय सरसंघचालक होते यांची कबुली दिली. ग्रंथालय भारतीच्या पुरस्कार वितरण समारंभात येथे संघाचे अखिल भारतीय प्रचार व प्रसार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी ही बाब मान्य केली. हेडगेवार यांच्यानंतर डॉ. परांजपे हे सरसंघचालक होते. मात्र आजवर संघाने कधीच ही बाब जाहीररीत्या मान्य केली नव्हती.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडेच संघाच्या स्वातंत्र्य लढय़ातील सहभागाबद्दल शंका उपस्थित केली होती. त्या अनुषंगाने वैद्य यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा इतिहास मांडला. ते म्हणाले की, संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार १९३० मध्ये जंगल सत्याग्रहात सहभागी झाले होते. त्यातील त्यांचा सहभाग हा स्वयंसेवक म्हणून होता. त्यामुळे त्यांनी सरसंघचालक पद सोडले होते. या काळात डॉ. परांजपे यांच्याकडे या पदाची सूत्रे होती. एक वर्षांनंतर डॉ हेडगेवार परत आल्यावर पुन्हा त्यांच्याकडे सरसंघचालकपदाची सूत्रे आली. त्यामुळे परांजपे हे दुसरे सरसंघचालक ठरतात.

राहुल गांधींवर टीका

राहुल गांधी यांना संघ काय आहे हे माहिती नाही आणि त्यांना माहितीही करून घ्यायची नाही. त्यांना केवळ भारताचा इतिहास माहीत आहे. संघाने काय केले हे समाजाला माहिती आहे आणि ते वास्तव आहे. सध्या ते आपल्या घराण्याचा जुना इतिहास सांगून प्रचार करीत आहे. समाज संघाच्या सोबत असून काँग्रेसचा जनाधार कमी होत आहे. त्यामुळे राहुल गांधी अशी विधाने ते करीत आहेत, अशी टीका मनमोहन वैद्य यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.