आमदार निवासातील बलात्कारामुळे मानसिक आघात झालेल्या पीडित अल्पवयीन मुलीने दोन दिवसांपासून अन्नपाण्याचा त्याग केला आहे. शुक्रवारी तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला.

पीडित मुलगी ‘सिटी ज्वेलर्स’ नावाच्या दुकानात कामाला होती. १४ एप्रिलच्या रात्री तिच्या मालकाने आपल्या कुटुंबीयांसह भोपाळ येथे सोबत येण्याची विनंती केली आणि तिला आमदार निवासात नेले. तेथे तिच्यावर सतत तीन दिवस बलात्कार करण्यात आला. या प्रकरणाची संपूर्ण राज्यभरात चर्चा सुरू असल्याने पीडित मुलगी नैराश्येच्या गर्तेत सापडली आहे. तिने अन्नपाणी सोडल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी तिने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गळफास घेण्याचा प्रयत्न केला; पण वडिलांनी तिला रोखले. शनिवारी तिची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे सकाळी तिला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचार करून तिला घरी सोडले.

पीडित मुलीचे कुटुंबीय तणावात आहेत. शुक्रवारी रात्री पीडित मुलीच्या वडिलांशी संपर्क केला असता मुलीने अन्नपाणी सोडले असून आत्महत्या करण्यासंदर्भात बोलत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना पोलिसांशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. मात्र, मुलीवरील अत्याचाराने त्यांना अश्रू अनावर होतात. ते पोलिसांतही जाण्यास घाबरत आहेत.  – नीता ठाकरे, सदस्य, राज्य महिला आयोग