कागदांपासून विमान तयार करून ते फुंकर घालून उडवण्याचा प्रकार अनेकांनी त्यांच्या लहानपणी केलेला आहे. मात्र, कचऱ्यातील थर्माकोलवर प्रक्रिया करून विमान तयार करणे व त्याला रिमोट कंट्रोलवर उडवण्याची किमया एका आठवीतल्या विद्यार्थ्यांने साध्य केली. त्याची ही किमया आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’च्या दिशेने वाटचाल करत आहे.

पॅकिंगसाठी वापरले जाणारे थर्माकोल कचऱ्यात टाकले जाते, पण यापासून नाविन्यपूर्ण वस्तू तयार होऊ शकतात, हे कुणाच्याही लक्षात येत नाही. आठव्या वर्गातल्या महेश्वर ढोणे याने या कचऱ्यातून विमान तयार केले. त्याला यंत्र लावून रिमोटच्या सहाय्याने यशस्वी उड्डाणही केले. जाड थर्माकोलला कापून त्यातून ८५ सेंटीमीटरचे विमान आणि १ मीटरचे पंख तयार केले.

विमानाचा आकार त्याने स्वत:च तयार केला. निर्मिती प्रक्रियेत तो चुकला, पण विमान तयार करणे त्याने थांबवले नाही. त्याचे मार्गदर्शक एरोविजनचे राजेश जोशी यांनी चुकांमागील कारणे सांगितली आणि तो नव्या आत्मविश्वासाने काम करत गेला. तब्बल सहा महिन्यानंतर त्याला हे विमान पूर्णपणे तयार करण्यात यश आले.

आईवडिलांच्या पाठिंब्यामुळे त्याच्यातला उत्साह दुणावला आणि तयार झालेल्या विमानाला रिमोटने उडवता यावे म्हणून १२ वोल्टची ब्रशलेस मोटर आणि १२ वोल्टची बॅटरी लावून त्या विमानाला उडण्यायोग्य बनवले. कोकाकोलाच्या शिशीपासून त्याने विमानाचे कॉकपिट तयार केले. यात छोटी-छोटी यंत्र वगळता संपूर्ण विमान तयार करण्यासाठी त्याने टाकाऊ वस्तूंचाच वापर केला. आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची ही कामगिरी कौतुकास्पद असून ती लवकरच नागपूरकरांना ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये दिसून येणार आहे.

आईला आनंद     

सुरुवातीला जेव्हा तो घरात कचरा करायचा तेव्हा मी खूप चिडायची, पण महेश्वरमधील चुणूक राजेश जोशी यांनी ओळखली आणि त्यांनी आम्हाला ते पटवून दिले. एक दिवस मी स्वत: विमान तयार करेल आणि ते उडवेल हे त्याचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले, यापेक्षा दुसरा आनंद नाही, असे महेश्वरची आई जयश्री सुनील ढोणे म्हणाल्या.

उद्दिष्टपूर्तीचा आनंद

चाचणीसाठी म्हणून जेव्हा विमान उडवण्याची तयारी केली तेव्हा उतरवताना ते एका दुचाकी वाहनावर आपटले आणि तुटले. त्यामुळे आत्मविश्वास कमी झाला. मग पुन्हा प्रयत्न केले आणि विमान योग्यरितीने उडाले. आयुष्यात पहिल्यांदा स्वत:हून काहीतरी निर्मिती केली होती आणि त्याच्या पूर्तीचा आनंद काही वेगळाच होता, अशी प्रतिक्रिया महेश्वरने दिली.

नव्या पिढीचा एरो मॉडेलर

महेश्वर नव्या पिढीचा एरो मॉडेलर आहे. त्याने अलीकडेच दिल्ली येथे एरोमॉडेलर असोसिएशनने आयोजित केलेल्या एका स्पध्रेत वॉक अलार्म ग्लायडरमध्ये पहिले पारितोषिक मिळवले, तेव्हाच त्याच्यातली चुणूक जाणवली. तासन्तास सराव करत त्याने त्याचे ध्येय साध्य केले. महेश्वरसह पाचही विद्यार्थी एरो मॉडेलिंगचा झेंडा फडकवतील व एरोविजनचे नाव मोठे करतील यात शंका नाही.