आंबेडकर गौरव ग्रंथाचे प्रकाशन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात केले असते तर आज भारताचा विकास दर ३ टक्क्याने वाढला असता मात्र, यासंबंधी दोषारोपण करण्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित देशांतर्गत जलवाहतूक आणि नदीजोड प्रकल्पावर काम करून ते २०१८पर्यंत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रकाशित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष गौरव ग्रंथाचा लोकार्पण समारंभ विद्यापीठ परिसरात पार पडला. गडकरी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रखर देशभक्त होते आणि त्यांनी समान नागरी कायद्याचे समर्थनही केले. जल वाहतुकीवरील बाबासाहेबांचे काम दुर्लक्षित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. वाहतुकीवरचा खर्च सांगताना ते म्हणाले की, आपल्याकडे रेल्वे वाहतुकीवर एक रुपया, विमानावर दीड रुपया तर जलवाहतुकीवर केवळ १५ ते २० पैसे खर्च येतो. आपली ‘लॉजिस्टिक कॉस्ट’ही १८ टक्के आहे. त्याचवेळी अमेरिका आणि युरोपची १२ टक्के, चीनची ८ टक्के आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आत्मसात केले असते तर आज भारताचा विकास दर ३ टक्क्याने वाढला असता. १११ नद्यांचा जलवाहतुकीत रूपांतर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी दोन नद्यांचे काम साहेबगंज आणि वाराणसी दरम्यान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे म्यानमारपासून ते दक्षिण अफ्रि केपर्यंत आपण पोहोचू शकू, या नदी जोड प्रकल्पाचा फायदा उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारला होणार असून हे काम २०१८च्या आत पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.

या ग्रंथाचे संपादक आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. मधुकर कासारे यांनी, राष्ट्र उभारणीच्या कार्यात डॉ. आंबेडकरांचे अनन्यसाधारण योगदानाबाबत माहिती दिली. डॉ. आंबेडकरांनी १९३८ला मांडलेले कुटुंब नियोजन बिल, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आणि स्वस्त वीज ही त्रिसूत्री विकासासाठी अतिशय महत्त्वाची असून त्यांच्या अंमलबजावणीबरोबरच दिल्लीच्या धरतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनची उभारणी नागपुरात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यासपीठावर योजना आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पूरण मेश्राम व्यासपीठावर होते.