आरक्षणाचा फेरविचार करावा, असे वक्तव्य करून वाद अंगावर ओढून घेणारे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज या वादातून स्वत: अंग काढून घेतले. आरक्षणाच्या वादात संघ पडत नाही. ते संघाचे कामही नाही, असे प्रतिपादन त्यांनी येथील अखिल भारतीय वाल्मिकी महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनात केले.

येथील अजंता सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाल्मिकी महासभेच्या नेत्यांनी त्यांच्या समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा मांडला होता. तोच मुद्दा पुढे नेत भागवत यांनी आरक्षणावर संघाची भूमिका मांडली. ते म्हणाले की, आरक्षणाची काय व्यवस्था करण्यात आली, कोणत्या जागा भरण्यात आल्या, कोणता व्यवसाय बंद पडल्याने किती लोकांना त्याचा फटका बसला, हे सर्व विषय संघाच्या अजेंडय़ावर नाहीत. यात संघ कधीही पडत नाही. समाजातील विषमता दूर करण्यासाठी जे काही प्रामाणिक आणि निस्वार्थ प्रयत्न झाले त्याला संघाचे समर्थन आहे. त्याचा सर्वाना फायदा व्हावा, ही संघाची अपेक्षा आहे.

यापूर्वी भागवत यांनी आरक्षणाचा फेरविचार करावा, असा मुद्दा मांडला होता व त्यामुळे देशभर वादळ उठले होते. त्यावर टीकाही झाली होती. आज भागवत यांनीच त्यातूनच अंग काढून घेतले आहे.