स्वच्छता अभियान

महापालिका आणि काही पर्यावरणवादी संघटनांच्या वतीने गेल्या काही वर्षांत प्लास्टिकच्या संदर्भात जनजागरण मोहीम राबवून त्याचा वापर टाळावा, असे आवाहन केल्यानंतरही नाले स्वच्छता अभियानामध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ काढताना त्यातून मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक बाहेर काढण्यात आले आहे. याच प्लास्टिकमुळे शहरातील विविध भागातील नाले आणि चेंबरचे मेनहोल बंद होऊन पाणी साचण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत समोर आले आहे. हे विशेष.

गेल्या काही वर्षांत पर्यावरण आणि मानव-पशूंच्या आरोग्यास हानीकारक ठरलेल्या प्लास्टिकचा वापर शहरामध्ये धडाक्यात व खुलेआम सुरू असून त्याचे ना प्रशासनाला सोयरसुतक ना नागरिकांना. अधूनमधून प्लास्टिक पिशव्या जप्तीची मोहीम घेतली जाते नि तेवढय़ाच आकस्मिकपणे ती थांबवली देखील जात असताना त्याचा परिणाम म्हणजे नदीनाल्यातून मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्या दिसून येत आहे. गेल्या दहा दिवसांपासून नागनदीसह पिवळी आणि पोरानदी स्वच्छता अभियान राबवले जात असून त्यातून जागोजागी गाळ बाहेर काढला जात असताना त्यातून प्लास्टिक मोठय़ा प्रमाणात बाहेर काढले जात आहे. नागनदीमधून गेल्या आठ दिवसात १४०० टनच्या जवळपास गाळ काढण्यात आला असताना ४०० किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पिवळी आणि पोरा नदीमधून गाळ काढण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी सुद्धा अशीच परिस्थिती आहे. पिवळी नदीतून ३५० तर पोरा नदीमधून २०० किलोच्या जवळपास प्लास्टिक बाहेर काढण्यात आले आहे. नद्यांमधील हा गाळ पूर्व नागपुरातील वाठोडा आणि कळमना भागातील मोकळ्या जागेत टाकला जात असताना त्या ठिकाणी काही कामगार त्या गाळामध्ये असलेले प्लास्टिक बाजूला काढण्याचे काम करत आहे. या प्लास्टिकच्या वस्तूमध्ये बिसलरीच्या बॉटल, चहा आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे ग्लास, पाऊच, पिशव्यासह वेगवेगळ्या वस्तू बाहेर काढल्या जात असून त्या त्या भागातील झोपडपट्टीत राहणारे कामगार जमा करीत आहेत.

शहरामध्ये भाजीवाला, फळवाला, किराणा दुकान, खाद्यवस्तू विक्री दुकान, औषधे आदी सर्वच ठिकाणी पातळ व कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आज सर्रास सुरू आहे. याच प्लास्टिकच्या पिशव्यांमधून टाकाऊ अन्न वा वस्तू लोक नाल्यामध्ये फेकून देत असतात. शिवाय महाराजबाग, अंबाझरी तलाव, फुटाळा तलाव, सोनेगाव तलाव, बालोद्यान या ठिकाणी येणारे लोक प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देतात आणि मग त्याच पिशव्या नाल्यात जात असतात. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचू लागले की, नागरिक महापालिका प्रशासनावर टीका करतात.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी प्लास्टिक पिशव्या जप्तीची मोहीम हाती घेतली जात असताना काही दिवस ती धूमधडाक्यात राबवली जात असून लाखो रुपये दंड वसूल केला जातो. मात्र, पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. नाल्यातून बाहेर काढण्यात आलेल्या या प्लास्टिकचा उपयोग महापालिका कसा करणार की पुन्हा ते नाल्यात जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील नागनदी, पिवळी आणि पोरा नदीमधील गाळ काढला जात असताना त्यातून प्लास्टिक वेगळे केले जात आहे आणि त्यावर पूनर्प्रक्रिया केली जाणार आहे. नागरिकांना प्लास्टिक नदीशहरातील नागनदी, पिवळी आणि पोरा नदीमधील गाळ काढला जात असताना त्यातून प्लास्टिक वेगळे केले जात आहे , नाल्यात टाकू नये, असे आवाहन अनेकदा केले आहे. बंदीची कारवाई सुरू असून जनजागृती केली जात आहे. त्यानंतरही नागरिक नियमाचे पालन करीत नाहीत. येणाऱ्या दिवसात प्लास्टिक बंदी संदर्भात कडक धोरण राबवण्यात येणार आहे.

डॉ. मिलिंद गणवीर, आरोग्य अधिकारी, महापालिका