उन्हाळ्याच्या सुटय़ांमध्ये शाळा आणि परिसरांचा उपयोग विवाह समारंभासाठी केला जात असल्यामुळे गेल्या काही वर्षांत शाळांना मंगल कार्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात शाळांचा उपयोग विवाह समारंभासाठी होत असतो आणि त्या ठिकाणी विवाह समारंभासाठी विविघ सोयी सुविधा निर्माण केल्या जातात.

शहरात मंगल कार्यालय, लॉनची संख्या मोठी आहे. मात्र, त्याचे दर अधिक असल्याने मध्यमवर्गीय लग्न किंवा इतर समारंभासाठी विविध शाळा, शैक्षणिक संस्थांच्या जागा पर्याय म्हणून स्वीकारतात. शहरातील महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांचा तसेच इतर खासगी संस्थांच्या शाळांचा यात प्रामुख्याने समावेश असतो. पूर्व नागपुरातील वाठोडा परिसरातील महापालिकेच्या शाळेत गेल्या महिन्याभरात चार विवाह समारंभ झाले.

एप्रिल महिन्यात शाळांना सुटय़ा लागल्या की जवळपास दोन महिने शाळा बंद असतात. २६ जूनला शाळा सुरू होतात. या दरम्यानच्या काळात व्यवस्थापनाकडून शाळा लग्न समारंभासाठी भाडय़ाने देतात. यातून भाडय़ाच्या स्वरूपात उत्पन्नही मिळते. शहरात हे प्रमाण कमी असले तरी ग्रामीण भागात मंगल कार्यालयाची अपुरी संख्या बघता त्या ठिकाणी शाळा हा उत्तम पर्याय ठरतो. शाळेच्या पटांगणात मंडप टाकून वर्गखोल्या वर-वधूकडील मंडळींना उपलब्ध करून दिल्या जात असतात.

महाल परिसरातील हिंदू मुलींच्या शाळेतही नियमितपणे विवाह समारंभ होतात. याशिवाय विनायकराव देशमुख, वाठोडा परिसरातील जवाहर विद्यालय, निकोसे प्राथमिक शाळा, मस्कासाथमधील महापालिकेच्या शाळा आदी ठिकाणी नेहमीच लग्न होत असतात. ग्रामीण भागातील अनेक शैक्षणिक संस्था या राजकीय पक्षाशी संबंधित नेत्यांच्या असल्यामुळे गावातील शाळेचा परिसर त्यांना विवाह समारंभासाठी उपलब्ध करून दिला जातो.

सामूहिक विवाह सोहळे मैदानात

विविध समाजांचे सामूहिक विवाह सोहळे शाळेच्या किंवा इतर मैदानात आयोजित केले जातात. दोन दिवसांपूर्वी चिटणीस पार्क मैदानात चर्मकार समाजाचा सामूहिक विवाह सोहोळा पार पडला. त्या ठिकाणी वाहनतळाची सोय नाही. हजारो लोकांची जेवणाची सोय सुद्धा या मैदानात करण्यात आली. त्यामुळे मैदान खोदून ठेवले आहे. दोन आठवडय़ापूर्वी गणेशनगरातील महापालिकेच्या मैदानात तेली समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.