हजारो अर्ज प्रलंबित, दलालांची लॉबी सक्रिय 

दरवर्षी प्रमाणे यंदाही शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावर जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘सेतू’ केंद्रात विविध प्रमाणपत्रांसाठी येणाऱ्या विद्यार्थी व पालकांची गर्दी वाढली आहे. येणाऱ्या अर्जाची संख्या व त्यांचा निपटारा करण्याचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे हजारो अर्ज प्रलंबित आहेत, त्याचा फटका पालक व विद्यार्थ्यांना बसत असून एका प्रमाणपत्रासाठी त्यांना दररोज कार्यालयात खेटे मारावे लागत आहे. दरम्यान, गर्दीचा फायदा घेण्यासाठी केंद्र परिसरातील दलालांची लॉबी सरसावली असून त्यांचे अधिकाऱ्यांशी संगनमत असल्याने त्यांच्याकडून गेलेल्यांना तात्काळ प्रमाणपत्रे  ेमिळू लागली आहेत. वर्षांनुवर्षे दलालांच्या विळख्यात अडकलेले सेतू केंद्र दलालांपासून मुक्त करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हेतूलाच यामुळे हरताळ फासला जात आहे.

दरवर्षी मे आणि जून महिन्यात सेतू केंद्रात विविध प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याने ती कमी करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शाळा, महाविद्यालयातूनच हे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था निर्माण केली होती, त्यानंतर विद्यमान जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनीही सेतू केंद्राच्या कामकाजाच्या वेळेत वाढ केली. केंद्रावर गर्दी  होऊ नये म्हणून अर्जदारांना एसएमएसव्दारे माहिती देण्याची व्यवस्था केली. आता तर सुटीच्या दिवशीही हे केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे. शासनाने शहराच्या विविध भागात महा-ईसेवा केंद्र सुरु करून तेथे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली, अर्ज केल्यावर कागदपत्रांमध्ये त्रृटी नसेल तर सात दिवसांत प्रमाणपत्र देण्याचे बंधन आहे. मात्र या सर्व उपाययोजना आजवर कुचकामी ठरल्या असल्याचे चित्र सेतू केंद्राला भेट दिल्यावर लक्षात येते. अर्जाचे हजारो गठ्ठे इतस्तत: विखुरलेले दिसतात, सात दिवसात प्रमाणपत्र मिळणे तर दूरच तेथे गेल्यावर अर्जदारालाच त्याचा अर्ज शोधण्यापासून कामाला लागावे लागते. अर्ज मिळाला की संबंधित अधिकाऱ्याकडे सहीसाठी पाठविले जाते. अधिकारी जागेवर नसतो, असेल तरी तो सही करण्याच्या मनस्थितीत नसतो. अनेक पालक सुटी घेऊन रांगेत उभे असलेले दिसतात, काही पालक दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन दिवसभर केंद्राच्या बाहेर ताटकळत उभे राहिल्याचे चित्र तर सध्या सर्रास पाहायला मिळते. एवढा सेतू केंद्रातून प्रमाणपत्र मिळवण्याचा सोपस्कार कठीण झाला आहे.

दुसरीकडे दलालांची लॉबी सक्रिय आहे. सेतू केंद्रातील कर्मचाऱ्यांपासून थेट स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत या लॉबीचे हात पोहोचलेले आहेत. एक दिवसात प्रमाणपत्र हवे असेल तर ५०० रुपये मोजा आणि सायंकाळी प्रमाणपत्र घेऊन जा अशी पर्यायी व्यवस्था येथे खुलेआम अनुभवाला मिळते. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रमाणपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी दिवस वाटून देण्यात आले आहे. त्यांचे मूळ काम करून हे अतिरिक्त काम त्यांना करावे लागते. दिवसभर मूळ काम पुरत असल्याने त्यांच्याकडेही अर्जाचे गठ्ठे साचले आहेत. स्वाक्षरी तरी किती अर्जावर करायची असा त्यांच्यासमोरचा यक्ष प्रश्न आहे. नागरिकांनाही मे-जून मध्येच प्रमाणपत्रांची आठवण येते, आम्ही तरी काय करावे, असा सवाल एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.

आज, उद्या विशेष शिबीर

सेतू केंद्रात विविध प्रमाणपत्रासाठी झालेली गर्दी लक्षात घेता नागरिकांची गैरसोय टळावी म्हणून १० व ११ जून रोजी मेडिकल चौकातील पंडित बच्छराज व्यास विद्यालय आणि धरमपेठ गर्ल्स हायस्कूल, उत्तर अंबाझरी मार्ग येथे  शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, वय, अधिवास, राष्ट्रीयत्व, उत्पन्न आणि शपथपत्र यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

सेतू केंद्र की आठवडी बाजार?..

शाळा, महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात विविध प्रमाणपत्रांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची एकच गर्दी उसळलेली आहे. प्रशासनाचे नियोजन फसल्याने सध्या या केंद्राला आठवडी बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. केंद्रात प्रमाणपत्रांच्या अर्जाचे असे गठ्ठे पडलेले आहेत. गरजूंना यातून त्यांचा अर्ज शोधावा लागतो. बाहेरही  प्रमाणपत्रांसाठी अशा लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दररोजचे आहे.

शिबिरातील अर्जही प्रलंबित

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील आमदारांनी विविध प्रमाणपत्रांसाठी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरातील अर्जही अद्याप प्रलंबित असल्याची तक्रार पालकांनी केली. झटपट अर्ज मिळण्याचे आश्वासन हवेतच विरल्याची खंतही पालकांनी व्यक्त केली.

सौजन्याचाही अभाव

अनेक पालकांनी एक महिन्यापूर्वी अर्ज करूनही त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही, प्रवेश अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असल्याने ते सेतू प्रमुखांना अक्षरश: विनवणी करतात, अधिकाऱ्यांच्या कक्षात जावून हातपाय जोडतात, पण कोणीच त्यांना मदत करीत नाही, ही बाब नित्याचीच झाली आहे. बोलण्यात साधे सौजन्य नसल्याबद्दल अनेक पालकांनी संताप व्यक्त केला आहे.