राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने पुढे आलेले व्यक्तिमत्त्व हे आपल्याच विचाराशी सहमत असलेल्या लोकांशी संवाद साधत असताना ते बाहेर सुसंवाद ठेवत नव्हते. त्यांच्या विचाराचा दृष्टीकोन त्यांच्या विचारांशी असलेल्या लोकांपुरता सीमित होता. त्यांच्या सहकाऱ्यांची चौकट मर्यादित असायची. मात्र सुसंवादातून लोकशाही मजबूत होऊ शकते हा विचार मांडत संघाच्या या विचारांच्या चौकटीला छेद देण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

दळवळणाच्या क्षेत्रात नितीन गडकरी यांचे देश पातळीवर महत्त्वाचे स्थान आहे. राजकारणात मतभिन्नता असली तरी मतभेद नसले पाहिजे ही भूमिका गडकरी यांची आहे. राज्याचा आणि देशाचा विकास करताना वैचारिक मतभिन्नता असली तरी सुसंवादातून लोकशाही मजबूत कशी होऊ शकते आणि विकासाच्या कामाला गती मिळू शकते हे गडकरी यांनी जाणीवपूर्वक जपले आहे. त्यांच्या हातामध्ये दिलेले काम केलेले काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. निवडणुकीच्या काळात एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतली असेल पण जिथे देशाचा व राज्याचा विकास करायचा आहे त्या ठिकाणी सुसंवादातून गडकरी यांनी देशहिताचा विचार केला आहे. देशाचा विकास हवा असेल तर प्रभावी दळवळणाची साधन हेच विकासाचे महत्त्वाचे गमक आहे आणि ते स्वत:च्या कर्तुत्वाने देशाच्या पातळीवर गडकरी यांनी करून दाखविले आहे. संसदेमध्ये ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी प्रामुख्याने नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज यांची चर्चा होते. एक मराठी माणूस देशाच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक विचार करून निर्णय घेत असतो. त्यामुळे त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगत शरद पवार यांनी गडकरी यांच्या राजकीय कार्याचा गौरव केला.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ६१व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. त्यांच्या षष्ठय़ब्दीपूर्तीनिमित्त त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकाच्यावतीने कस्तुरचंद पार्क मैदानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहाण, छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमनसिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री सुभाष देसाई, सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर उपस्थित होते. सत्काला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्यानंतर भाजयुमो आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि त्यानंतर पक्षाने दिलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि सन्मान पक्षाने भरपूर काही दिले आहे. त्यामुळे कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. समाजातील तळगाळातील, गोरगरीब लोकांसाठी काम करायचे आहे. महाराष्ट्रात मंत्री म्हणून काम करीत असताना दिल्लीमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गेलो तर ज्या खुर्चीवर अटलजी आणि अडवानींच्या खुर्चीवर मला बसण्याची संधी मिळाली. पण मला ते पटत नव्हते. मला लोकांचे खूप प्रेम मिळाले. सकारात्मक दृष्टीकोन ही माझ्या आयुष्याची संपत्ती आहे. देशातील विविध राजकीय पक्षातील नेत्याचे मला प्रेम मिळाले आहे. जे मागायला येतो त्यापेक्षा मी जास्त देत असतो. देशामध्ये विकासाच्या दृष्टीने मी कुठल्याच पार्टीचा विचार केला नाही. विचाराच्या आधारावर मनभेद असतात पण मतभेद नाही. माझ्या कुटुंबातील राजकारणात कोणी आले नाही. यायचे असेल तर स्वतच्या कर्तुत्वावर या असे सांगतो. जो व्यवस्थेला न्याय मिळत नाही ते उखडून फेका. जनतेच्या हितासाठी काम करायचे आहे. लोकांसाठी खूप काम करायचे आहे.

मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांकडून गौरव

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण म्हणाले, मध्यप्रदेशच्या विकासात नितीन गडकरी यांचे मोठे योगदान आहे. राज्याच्या विकासात काम करताना कुणाची तरी प्रेरणा हवी असताना गडकरी यांनी ते काम केले आहे. महाराष्ट्रात चांगले काम करण्यात आले आहे. गडकरी हे प्रेरणादायक आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा राहत नाही. आम्ही मागतो त्यापेक्षा ते जास्त देतात. कंत्राटदाराकडून काम करून घेत असतात. एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. ज्ञान, भक्ती आणि कर्म याचा त्रिवेणी संगम म्हणजे नितीन गडकरी असल्याचे सांगत त्यांनी गौरव केला. यावेळी छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह म्हणाले, नवीन तंत्राचा उपयोग करून दूरदृष्टी ठेवत त्यांनी काम केले. नक्षलक्षेत्रात गडकरी यांनी रस्त्यांची कामे केली. ज्या भागात रस्ते शक्य नव्हते त्या भागात त्यांनी रस्ते केले. राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी आपल्या विकास कामाची छाप पाडली आहे. पाच कामे घेऊन जातो तर ते दहा कामे करून देतात. जे बोलतात ते करून दाखवतात, असे सांगत रमणसिंग यांनी गौरव केला.

रामदास आठवलेंच्या भाषणामुळे हास्य फुलले

‘नितीन गडकरी तुम्ही केले आज वर्षे ६०, आता मी नाही सोडणार तुमची पाठ, देशात आली मोदी लाट, म्हणून पडली तुमच्या सोबत गाठ, आता धरू आपण विकासाची वाट, तुम्हाला झाली वर्षे साठ’ यासह इतर एक कविता रामदास आठवले यांनी उपस्थितांना एकवत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. आठवले पुढे म्हणाले की, निवडणुकीत एकमेकांचे तोंड न बघणारे आज गडकरींच्या कार्यक्रमात एकत्र आले, ही राज्याची संस्कृती आहे. सामान्यांकरिता चांगले काम केल्यास अपघातात काही होत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताने दाखवून दिले आहे. पवार साहेबही अपघातात बचावले असून माझा अद्याप अपघात झाला नसल्याचे सांगत त्यांनी पुन्हा सगळ्यांना हसवले.

सत्काराच्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि कार्यकर्ते मिळून १ कोटी १ लाखाची थैली नितीन गडकरी यांना सत्कार समारंभावेळी अर्पण केली. समितीच्यावतीने देण्यात आलेला निधी शासकीय अनुदानावर न चालणाऱ्या समाजातील विविध सामाजिक संस्थांना देणार आहे.