शरद पवार यांची टीका

सत्ताधाऱ्यांबद्दल विश्वास असल्यास लोक रस्त्यावर उतरत नाहीत. मात्र, राज्यातील राज्यकर्त्यांबद्दल जनतेला खात्री राहिलेली नाही. सत्ताधारी आपल्या हिताची जपणूक करू शकतील, असा विश्वास नसल्याने लोक रस्त्यावर उतरत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा क्रांती मूकमोर्चाबद्दल बोलताना फडणवीस सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यांची सुरुवात गुरुवारी नागपुरातून झाली. यावेळी पवार यांनी मराठा मोर्चा हा जनतेतील असंतोष दाखवून देत असल्याचे टीकास्त्र फडणवीस सरकारवर सोडले.

मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी प्रकरणात एका महिन्यात आरोपपत्र दाखल करणार असल्याचे सांगितले होते. आज तीन महिने झाले, पण आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे लोकांच्या मनात सरकारबद्दल राग आहे. अ‍ॅॅट्रॉसिटी कायद्यात बदल किंवा सुधारणा करण्यात येऊ नये. हा कायदा आहे तसाच राहिला पाहिजे, परंतु त्याचा दुरुपयोग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाबद्दल सत्ताधारी भाजपचा लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप केला.

गुलाबराव गावंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

अकोला जिल्ह्य़ातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी गुरुवारी नागपूर येथे शरद पवार यांची भेट घेतली. गावंडे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणावर शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवरून पक्षातील अनेक नेते नाराज आहेत.  गावंडे विविध क्रीडा संघटनांशी जुळलेले आहेत. अकोला जिल्ह्य़ात क बड्डी स्पर्धेच्या निमित्ताने पवार यांचा सत्कार करण्याचा त्यांचा बेत आहे. त्यासाठी  ही भेट होती, असे गावंडे यांचे निकटवर्तीय सांगतात.