‘बीपीएल’धारक रुग्णांची परवड
वातावरणातील बदलामुळे गेल्या काही दिवसात खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. डेंग्यू, मलेरियासह आदी रोगांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेडिकल) आणि इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांना औषधे दिली जात नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी फिरावे लागत आहे. रुग्णालयातील औषध पुरवठा कमी केल्यामुळे बीपीएल रुग्णांची फारच गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (बीपीएल) दारिद्रय़ रेषेखालील असलेल्या रुग्णांसाठी औषध नसल्यास स्थानिक पातळीवर रुग्णालयाला (लोकल पर्चेस) औषध खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला असून अधिष्ठात्यांना त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून स्थानिक औषध विक्रेत्यांची लाखो रुपयांची देयके मेडिकल आणि मेयो प्रशासनाने दिली नसल्यामुळे त्यांनी औषध पुरवठा करणे बंद केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दारिद्रय़ रेषेखालील येणाऱ्या रुग्णांसाठी अधिष्ठात्याच्या अधिकार क्षेत्रात स्थानिक औषध पुरवठादारांकडून औषध खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, मात्र सध्या काही स्थानिक औषध विक्रेत्यांनी औषध पुरवठा करणे बंद केले आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात रुग्णांची गैरसोय होत आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे खरेदी करून घेऊन या, असे रुग्णालयातून सांगितले जात आहे. विविध कंपन्यांची देयके देण्याबाबतचा प्रस्ताव मेडिकल प्रशासनाने राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागाकडे पाठविला आहे, मात्र त्याला अजूनपर्यंत मंजुरी मिळाली नाही. मेडिकलमध्ये ग्रामीण भागातील अनेक गोरगरीब रुग्ण येत असतात. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे महाग असतात. त्यामुळे सामान्य नागरिक ती खरेदी करू शकत नाही. शिवाय दारिद्रय़ रेषेखालील असलेल्या रुग्णांना रुग्णालयातून मोफत औषधे दिली जातात, मात्र ती त्यांना मिळत नाही, अशी तक्रार अनेक बीपीएलधारकांनी केली आहे. मेडिकलमध्ये औषध नसल्यास दारिद्रय़ रेषेखालील मोडणाऱ्या रुग्णांसाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी केली जात नाही. त्यामुळे अनेक रुग्णांची आर्थिक स्थिती नसताना त्यांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागतात. मेडिकल आणि मेयो रुग्णालयात बीपीएल रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागणार नाही. रुग्णालयातून त्यांना औषधे दिली जातील, असे आश्वासन नागपूर भेटीत आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी दिले होते, मात्र रुग्णालयात प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे दिसून येत आहे.
या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निस्वाडे यांनी सांगितले, रुग्णालयात जी औषधे लिहून दिली जातात त्यातील सगळी औषधे रुग्णालयात असतील, असे नाही. काही औषधे बाहेरून आणावी लागतात आणि तशी सूचना रुग्णांच्या नातेवाईकांना देत असतो. औषधांचा कुठलाच तुटवडा नाही. कुठल्याही औषध कंपन्यांची देयके रोखण्यात आली नसल्यामुळे त्यांनी पुरवठा बंद केला नाही. आमच्याकडे रुग्णांची अशी कुठलीही तक्रार नाही. बीपीएल रुग्णांना रुग्णालयातून औषधे दिली जातात. मात्र, जी उपलब्ध नाही आणि ती बाहेरून खरेदी करावी लागत असल्यामुळे ते तक्रारी करतात त्याला आमचा उपाय नाही. रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर चांगले उपचार व्हावे, यासाठी मेडिकल प्रशासन पूर्ण काळजी घेत असल्याचे डॉ. निस्वाडे यांनी सांगितले.