श्रीहरी अणे यांचा आरोप

केंद्र सरकारकडे नवीन राज्याच्या निर्मितीबाबत कोणतेही धोरण नाही. त्यामुळे लहान राज्यांकरिता झालेले आंदोलन हिंसक झाल्यास केंद्र सरकार त्याची दखल घेते, असा आरोप नवराज्य निर्माण संघाचे अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी केला. रविवारी नवराज्य निर्माण संघाच्या अधिवेशनादरम्यान निवडक पत्रकारांशी ते बोलत होते.

केंद्राने उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा या चार नवीन राज्यांची निर्मिती झाली. तेलंगणासाठी झालेल्या हिंसक आंदोलनात अनेकांचे मृत्यू झाले. त्यामुळे सरकारने दबावात येऊन तेथे नवीन राज्य दिले. छत्तीसगडच्या मागणीसाठी तेथे कधीच आंदोलन झाले नाही. परंतु त्यानंतरही सरकारने हे राज्य दिले. या सर्व राज्यांची निर्मिती बघता नवीन राज्य करण्याबाबत सरकारकडे ठोस धोरणाचा अभाव असल्याचे दिसून येते. अशा प्रकारचे धोरण तयार करावे, यासाठी नवराज्य निर्माण संघ सरकारवर दबाव निर्माण करेल, असे अणे म्हणाले.

सरकारने नियोजन आयोग संपुष्टात आणला. त्यामुळे देश विकासाकरिता भविष्याचे नियोजनच संपले, असे बुलेट ट्रेन, डोकलाम विवाद, शेतकऱ्यांचा गंभीर होत असलेल्या प्रश्नांवरून ते निदर्शनात येत आहे. केंद्र सरकार सध्या केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दोनच व्यक्ती चालवत असल्याचे दृष्य आहे, अशी टीका त्यांनी केली.

प्रमोद बोरो म्हणाले की, केंद्र सरकारने लहान राज्य निर्मितीच्या विषयावर गेल्या तीन वर्षांत एक शब्दही काढला नाही. नवीन राज्ये झाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवराज्य निर्माण संघाकडून  दिल्लीत आंदोलन केले जाणार आहे. त्याचे स्वरुप काय असेल याबाबत लवकरच निर्णय होईल. आंदोलनाची तारीख व स्वरुप जाहीर केल्यास सरकारकडून ते दडपण्याचा प्रयत्न केला जातो. यात देशाच्या सर्वच भागातील संघटनांचा सहभाग राहील, अशी माहिती संघाचे कार्याध्यक्ष राजा बुंदेला यांनी दिली. नवराज्य निर्माण संघाचे पुढील अधिवेशन २० जानेवारी २०१८ मध्ये आसम येथील सोनिथपूर येथे घेण्याची घोषाणा याप्रसंगी करण्यात आली.

उद्धव ठाकरेंना पाठिंबा

उद्धव ठाकरे यांचे राजकारण स्वच्छच आहे. मुंबईचे महापौरपद टिकवण्यासाठी त्यांना काही नगरसेवकांची आवश्यकता होती. मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक मूळ शिवसैनिकच होते. राज ठाकरे यांना राग येणे स्वाभाविक आहे, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

आठवले-अणे यांची भेट

लहान राज्यांच्या मुद्यांवरून दिल्लीत पाठबळ मिळावे या हेतूने नवराज्य निर्माण महासंघाचे अध्यक्ष व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची नागपुरात भेट घेतली. सत्तेत असलेतरी आठवले यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे जाहीर समर्थन केले आहे. शिवाय विदर्भाच्या मुद्यांवरून पुढील महिन्यात रिपब्लिकन पार्टी इंडियाच्या वतीने एक संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या संमेलनाला अणेंसह इतही विदर्भवादी सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवराज्य निर्माण महासंघाच्या अधिवेशनाचा रविवारी नागपुरात समारोप झाला. दरम्यान आठवले  नागपुरात आल्याने अणे यांनी त्यांची भेट घेऊन विदर्भाच्या मुद्यांवर चर्चा केली. तसेच विदर्भाच्या मागणीला दिल्लीत मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी बोडोलॅन्ड, बुंदेलखंड,  पूर्वाचल राज्याचे समर्थक त्यांच्यासोबत होते.