परिवहन मंत्र्यांची घोषणा फोल
एसटी बसचालकांना अद्ययावत प्रशिक्षणाचा प्रयोग फसला
राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागीय केंद्रात पंधरा महिन्यांपूर्वी पहिल्या सिम्युलेटर कक्षाचे उद्घाटन केले होते. हा प्रकल्प लवकरच राज्यभरात राबवून अपघातग्रस्त एसटीच्या चालकाला या कक्षात प्रशिक्षित करून अपघातरहीत प्रवासाचे स्वप्न त्यांनी दाखवले होते. परंतु राज्यात नवीन सिम्युलेटर सोडा नागपूरचेही कक्ष तेव्हापासून सुरूच झाले नसल्याचे धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अपघातग्रस्त चालकांना अद्ययावत प्रशिक्षणााचा प्रयोग राज्यात फसल्याची चर्चा कामगार संघटनेत सुरु आहे.
वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (डब्ल्यूआयएए) या संस्थेच्या मदतीने एसटीच्या नागपूरच्या विभागीय कार्यालयात ‘सिम्युलेटर’ कक्षाची स्थापना १८ डिसेंबर २०१४ रोजी करण्यात आली होती. येथे राज्यातील पहिले अद्यावत ‘सिम्युलेटर’ यंत्र बसवण्यात आले. या कक्षाचे उद्घाटन परिवहनमंत्री पदाची जवाबदारी स्वीकारल्यावर खुद्द दिवाकर रावते यांच्या हस्ते झाले होते. अपघात झालेल्या विभागातील एसटीच्या चालकाला केंद्रात प्रशिक्षणाची सक्ती केली जाणार होती. त्यामुळे भविष्यात या चालकांकडून अपघाताची शक्यता कमी होणार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला होता. कार्यक्रमात दिवाकर रावते म्हणाले होते की, राज्यात प्रत्येक वर्षी २ लाखांहून जास्त अपघात होतात. त्यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. त्यावर नियंत्रणाकरिता राज्यातील रस्त्यांची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला बरोबर घेऊन कार्य करणार आहे. एसटीचे अपघात कमी करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात एसटीने सुरू केलेला ‘सिम्युलेटर’ कक्ष फायद्याचा असून दुसऱ्या टप्यात राज्यातील सहा मुख्यालयस्तरावर व त्यानंतर प्रत्येक जिल्हास्तरावर हे कक्ष स्थापन केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
हे उपकरण सुमारे ३० लाख रुपये किमतीचे होते. परंतु उद्घाटनाच्या दिवशीच या उपकरणातील सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. कक्षाची फित कापल्यावर हे यंत्र हाताळतांना परिवहनमंत्र्यांनाच त्याचा अनुभव आला. परंतु अद्याप त्यात दुरूस्ती झाली नसून या कक्षात उद्घाटनाच्या समारंभापासूनच टाळे लावण्यात आले आहे. उपकरणच बंद असल्याने तेव्हापासून या कक्षात अद्याप एकाही चालकाला प्रशिक्षित करण्यात आले नाही. राज्यभरात हे कक्ष सुरू करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा फोल ठरली असून, हे उपकरण सुरू होणार कधी? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. या विषयावर एसटीचे विभाग नियंत्रकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही.

हा प्रकारच चुकीचा
एसटी प्रशासनाने नागपूरच्या विभागीय केंद्रात अद्ययावत सिम्युलेटर यंत्र स्थापन करत हा प्रकल्प राज्यभर राबवण्याची केलेली घोषणा स्तुत्य होती. परंतु त्यानंतर हे कक्ष राज्यभर स्थापन करणे सोडा नागपूरचेही केंद्र अद्याप सुरू न होणे हा प्रकार चुकीचा आहे. तातडीने हे केंद्र सुरू करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे नेते सुभाष वंजारी यांनी व्यक्त केले.