डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) झोपेच्या औषधांची विक्री करण्यात येऊ नये, असा नियम असतानाही शहरात या औषध विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औषध प्रशासन विभागातर्फे एका घाऊक विक्रेत्याविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला वाचा फुटली आहे. श्रीनिवास गोपीकिसन सारडा यांच्या मालकीचे अजित फार्माटिक्स नावाचे दुकान आहे. या दुकानातून ‘नायट्रावेट’ नावाच्या औषधांचा शहरातील औषध विक्रेत्यांना पुरवठा करण्यात येतो. हे औषध ५ आणि १० एम.जी. प्रकारात उपलब्ध असून ते झोप येण्यासाठी वापरण्यात येते. या औषधांचा वापर आत्महत्या करण्यासाठी होऊ लागल्याने सरकारने त्याच्या विक्रीवर काही र्निबध घातले. त्यानुसार, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आणि औषध विक्रेत्यांच्या मागणीशिवाय त्यांचा पुरवठा करता येत नाही आणि अशा औषधांच्या विक्रीचा संपूर्ण तपशील ठेवावा लागतो. मात्र, सारडा यांनी अनेक औषध विक्रेत्यांच्या नावाचे बनावट बिल तयार करून हे औषध इतरत्र विकले. याची तक्रार औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आली होती. त्यामुळे २०१६ मध्ये तत्कालीन औषध निरीक्षक शहनाज ताजी यांनी प्रकरणाची चौकशी केली. १६ एप्रिल २०१६ ला अजित फार्मासिस्टच्या गांधीबाग परिसरातील जनरल र्मचट मार्केट येथील दुकान क्रमांक १०७ व १२० येथे छापा टाकला. त्यावेळी दस्तावेज ताब्यात घेऊन चौकशी केली असता बनावट बिलांच्या आधारावर त्यांनी औषध विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला.

वेलफेअर असोसिएशनची तक्रार

१६ एप्रिल २०१६ ला दुकानावर छापा टाकल्यानंतर औषध निरीक्षकांनी दुकानातून त्या औषध विक्रीवर बंदी घातली होती. काही दिवसांनी ही बंदी उठविण्यात आली. मात्र, पुन्हा सारडा यांनी बेकायदेशीरपणे विक्री सुरू केल्याची तक्रार अखिल भारतीय वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा कल्याणी वाघ यांनी केली. या तक्रारीच्या आधारावर औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वाती सुधाकर भरडे यांनी ३ मे २०१७ ला छापा टाकला. यावेळी पुन्हा सारडा यांनी बनावट बिल तयार करून नायट्रावेज नावाचे औषध इतरत्र विकल्याची बाब उघड झाली. त्यानंतर भरडे यांनी सारडाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली.

बनावट बिल

सारडा यांनी टेका नाका येथील मेसर्स जी.पी. मेडिकल्स, छापरूनगर येथील मेसर्स कांचन मेडिकल्स आणि कामठी येथील मेसर्स आयडीयल मेडिकोज यांच्या नावाने बनावट बिल तयार करून औषधांची विक्री केली. मात्र, शहानिशा केली असता या दुकानांच्या मालकांनी अशा औषधांची कधी मागणीच केली नसल्याचे समोर आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.

१०८७ स्ट्रीप्सची विक्री

बेंगळुरू येथील अँग्लो फ्रेंच ड्रग्ज अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीद्वारे ‘नायट्रावेट-५’  आणि ‘नायट्रावेट-१०’ हे औषध तयार करण्यात येते. एका स्ट्रीपमध्ये १५ गोळ्या असून त्याची अंदाजे किंमत ४०० ते ५०० रुपये आहे. सारडा यांनी २०१५ ते २०१६ या कालावधीत १ हजार ८७ स्ट्रीप्सची विक्री केली. त्यातील बहुतांश हे बनावट बिलाद्वारे विकले.