• महापौरपदासाठी नंदा जिचकार, उपमहापौरसाठी पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्षासाठी जाधव निश्चित; संदीप जोशी सत्तापक्ष नेते
  • रविवारी निवडणूक

१५१ सदस्यीय महापालिकेत १०८ जागा जिंकून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात सत्तेचे वाटप करताना जातीय संतुलन कायम ठेवत ‘सोशल इंजिनीअरिंग’चा प्रयोग केला आहे. महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतानाही या पदासाठी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील नंदा जिचकार यांना उमेदवारी देण्यात आली. उपमहापौरपदासाठी दीपराज पार्डीकर या हलबा समाजातील नगरसेवकाचे तर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी दलित समाजाचे संदीप जाधव यांचे नाव निश्चित करण्यात आले. सभागृहातील नेतेपदाची (सत्तापक्ष नेते) जबाबदारी ब्राह्मण समाजातील संदीप जोशी यांच्यावर टाकण्यात आली.

भाजपचे आमदार आणि पक्षाचे निवडणूक प्रमुख अनिल सोले यांनी बुधवारी ही नावे जाहीर केली. महापौर, उपमहापौरपदासाठी रविवारी निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपकडून जिचकार आणि पार्डीकर यांनी त्यांचे अर्ज दाखल केले. बहुमत असल्याने या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असून रविवारी अधिकृत निवडीची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. ते ६ मार्चला पदभार स्वीकारतील.

२५ लाख लोकसंख्येच्या या शहरात भाजपला प्रथमच इतके घवघवीत यश मिळाले आहे. सर्व जाती, धर्माने पक्षाच्या झोळीत भरभरून मते टाकल्याने सत्तेचे वाटप करताना पक्षानेही त्यांच्यावरील जातीयतेचा शिक्का पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांचा राजकारणाचा बाज हा नेहमीच बहुजनवादी राहिला आहे. त्याचे प्रतिबिंब तिकीट वाटपातूनही दिसून आले. खुल्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर पक्षाने ओबीसींना संधी दिली. यामुळे पक्षातील जुन्या व संघीय कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून गडकरी-फडणवीस यांनी जाणीवपूर्वक सर्वधर्मीयांना संधी देण्याचा प्रयत्न केला होता. सत्ता आल्यावरही महापालिकेतील महत्त्वाची पदे वाटप करताना तोच फाम्र्युला वापरण्यात आला. महापौरपद हे खुल्या गटातील महिलांसाठी राखीव असतानाही व पक्षाकडे या प्रवर्गातील महिला नगरसेविकांची संख्या असतानाही नंदा जिचकार या ओबीसी नगरसेविकेला या पदासाठी संधी देण्यात आली. उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर यांच्या निमित्ताने हलबा समाजाला, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी माजी उपमहापौर संदीप जाधव यांच्या रूपात दलित समाजाला संधी देण्यात आली आहे. सत्तापक्ष नेतेपदी संदीप जोशींच्या रूपात ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. सर्वधर्म समभाव असे स्वरूप या पदवाटपाला आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने आतापासूनच पावले उचलल्याचे यातून दिसून येत आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय सत्तावाटपावर लक्ष टाकले असता यावेळी महापौर आणि सत्तापक्ष नेतेपद हे मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघाला मिळाले आहे. यापूर्वी महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष अशी दोन महत्त्वाची पदे गडकरी यांचे निवासस्थान असलेल्या मध्य नागपूरमध्ये होती. यावेळी मध्य नागपूरला उपमहापौरपद देण्यात आले आहे. संदीप जाधव यांच्या निमित्ताने पश्चिमला स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे. महापौरपद मिळावे म्हणून पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे आणि पश्चिमचे आमदार सुधाकर देशमुख प्रयत्नशील होते.

दक्षिण-पश्चिमला झुकते माप, पूर्व, उत्तर, दक्षिण सत्तेविना

महापालिकेतील पहिल्या अडीच वर्षांसाठीच्या सत्तावाटपात मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाला झुकते माप मिळाले, तर पूर्व, उत्तर आणि दक्षिण नागपूर सत्तेविना राहिले. महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी अशी दोन महत्त्वाची पदे दक्षिण-पश्चिमकडे गेली. स्थायी समिती अध्यक्ष म्हणून नाव निश्चित झालेले संदीप जाधव पश्चिमचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, सर्वाधिक नगरसेवक निवडून आणणाऱ्या पूर्व नागपूरला एकही पद मिळाले नाही. या भागाचे आमदार कृष्णा खोपडे अडीच वर्षांपासून ते मंत्रीपद किंवा महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे म्हणून प्रयत्नशील होते. आता त्यांना महापालिकेच्या सत्तेपासूनही दूर ठेवण्यात आले. मावळत्या महापालिकेत सतीश होले यांच्या रूपात उपमहापौर दक्षिण नागपूरला मिळाला होता. यावेळी काहीच हाती आले नाही. विशेष म्हणजे, या भागाचे आमदार सुधाकर कोहळे हे पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत. अशीच गत उत्तर नागपूरचीही झाली आहे. यावेळी या भागातून पक्षाचे १३ नगरसेवक निवडून आले होते. धर्मपाल मेश्राम यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता होती. मात्र त्यांची निराशा झाली. या भागाचे आमदार मिलिंद माने आहेत.

काँग्रेस, बसपाचेही अर्ज

महापौर, उपमहापौर पदासाठी काँग्रेसने स्नेहा विवेक निकोसे (प्रभाग ९) आणि नितीन ग्वालबंशी (प्रभाग १० क) यांनी अर्ज दाखल केले, तर बसपाकडून वंदना राजू चांदेकर (प्रभाग ६) आणि नरेंद्र नत्थूजी वालदे (प्रभाग ९) यांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसकडे २९ तर बसपाकडे १० नगरसेवक आहेत.

हलबांच्या नाराजीची दखल

जात प्रमाणपत्राच्या मुद्यावर आश्वासन न पाळल्याने हलबा समाज भाजपवर नाराज होता. पक्षाचे नेते नितीन गडकरी यांना प्रचारादरम्यान त्याचा फटकाही बसला होता. मध्य नागपूरमध्ये झालेल्या मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्या सभेत हलबा समाजाने घोषणाही दिल्या होत्या. याशिवाय मतदानाच्या पूर्वसंध्येला गडकरी नाईक तलाव, बांगलादेश या वस्त्यांमध्ये गेले असता त्यांना हलबा समाजाने घेराव केला होता. ही नाराजी दूर करण्यासाठी या समाजाचे दीपराज पार्डीकर यांना उपमहापौर पदासाठी संधी देण्यात आल्याची चर्चा आहे. पार्डीकर यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाश्र्वभूमी आहे. त्यांचे वडील संघाचे पदाधिकारी होते, तर काका दिवंगत लक्ष्मणराव पार्डीकर हे संघाचे अ.भा. शारीरिक प्रमुख होते.