विदर्भातील वाघांनी भारतीय क्रिकेटपटूंनाच नव्हे, तर विदेशातील क्रिकेटपटूंनाही चांगलेच वेड लावले. व्याघ्रभूमीत भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने सामन्यानंतर थेट प्रवेश केला असला तरी विदर्भातील वाघांनी त्यांची वाट अडवली. म्हणूनच भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी सामना संपल्यानंतर थेट ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश केला. या क्रिकेटपटूंना शनिवारी पहिल्या दिवशी वाघाने हुलकावणी दिली, पण दुसऱ्या दिवशीच्या फेरीत त्यांना व्याघ्रदर्शन घडले आणि आनंदाने हे क्रिकेटपटू परतीच्या प्रवासाला निघाले.
भारतीय क्रिकेट संघातील अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजारा सपत्नीक शनिवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले. रॉयल टायगर रिसॉर्टवर त्यांचा मुक्काम होता. शनिवारी त्यांनी जंगल भ्रमण केले. मात्र, त्यांना व्याघ्रदर्शन झाले नाही. रविवारी पुन्हा त्यांनी पहाटेची सफारी केली. अवघ्या काही क्षणातच जामुनबोडी येथे त्यांना छोटय़ा तारा या वाघिणीने दर्शन दिले. छोटी तारा समोर आणि क्रिकेटपटू तिच्या मागे, असा काही क्षण प्रवास चालला. यावेळी चेतेश्वर पुजाराच्या पत्नीने तिच्यासोबत काढलेल्या सेल्फीत छोटी तारा सुद्धा कैद झाली. त्यानंतर तेलीयापाशी सुद्धा वाघीण आणि तिच्या तीन बछडय़ांचे दर्शन अवघ्या काही क्षणाच्या अंतराने चुकले. या दोन्ही क्रिकेटपटूंच्या आधीच्या वाहनातील पर्यटकांनी वाघीण व तिच्या बछडय़ांचे दर्शन घेतले. या क्रिकेटपटूंचे वाहन सुद्धा मागाहून आले. थोडावेळ त्या ठिकाणी थांबले, पण त्यांना व्याघ्रदर्शन होता होता राहिले. दुसऱ्या दिवशीच्या व्याघ्रदर्शनाने क्रिकेटपटू खुश होऊन परतले. यावेळी त्यांना सेवानिवृत्त वनाधिकारी अरुण तिखे यांनी ताडोबाविषयीची माहितीपुस्तिका भेट दिली.