कंत्राटदार भाजपचा, कारवाईकडे टाळाटाळ

उत्सवाचे दिवस असताना रस्ते दुरुस्ती, जलवाहिनी, मलवाहिनी टाकण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या खोदकामांमुळे विविध भागातील केबल मोठय़ा प्रमाणात खराब झाले आहे. तसेच पथदिवे दुरुस्ती योग्य प्रकारे होत नसल्याने शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यांसह अनेक वस्त्यामधील पथदिवे बंद आहेत. ऊर्जामंत्र्यांनी अनेकदा या संदर्भात महापालिका प्रशासनाला आदेश दिले. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. ज्या कंत्राटदाराकडे पथदिव्यांचे काम देण्यात आले आहे तो कंत्राटदार सत्तापक्षाच्या नेत्यांशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जात नाही. याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे.

महापालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांवर आलेल्या असताना शहरातील विकास कामे करण्यावर सत्तापक्षाची लगीनघाई सुरू आहे. यामध्ये रस्त्यांवरील पथदिव्यांकडे मात्र दुर्लक्ष असल्याचे दिसून आहे. महापौर प्रवीण दटके यांनी नुकतीच विद्युत विभागाची बैठक घेतली असताना त्यांना शहरातील विविध भागातील रस्त्यांवरील आणि वस्त्यांमधील पथदिवे बंद असल्याचे समोर आले. शहरात १ लाख २२ हजार ७६ पथदिवे आहेत. त्यातील १२ हजार ९०६ पथदिवे बंद असल्याची माहिती समोर आली. त्यातील बहुतेक विविध वस्त्यामधील आणि अनधिकृत लेआऊटमधील आहेत. अनेक वस्त्यांमध्ये रस्त्यावर विजेचे खांब उभे करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी दिवे नसल्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये रात्रीच्यावेळी अंधार असतो. प्रभागातील नगरसेवक तक्रारी करतात. त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाते.

पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे १० ते १२ कोटी रुपये दरवर्षी महापालिका खर्च करते. मात्र, रस्त्यांवरील रात्रीचा काळोख काही दूर होत नाही. शहरात साधारणत: १ लाखाच्या वर खांब असून तेवढेच पथदिवे आहेत. यातील ४ ते ५ टक्के पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी बंद असतात. विशेषत: रिंग रोडवरील पथदिवे केबल खराब झाल्यामुळे बंद आहेत. रस्ता दुभाजकावरील तसेच, वस्त्यांतील अंर्तगत खांबावरील दिवे बंद असतात. यासंदर्भातील तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या कित्येक वर्षांपासून पथदिवे दुरुस्तीचे कंत्राट एकाच कंत्राटादाराला देण्यात आले असून त्याला केवळ दुरुस्तीसाठी वर्षांला एक ते सव्वा कोटी रुपये दिले जातात. गेल्या काही दिवसात मनमानी पद्धतीने कंत्राटदाराचा कारभार सुरू असून त्याकडे प्रशासनाचे आणि पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.

शहरातील विविध भागातील बंद असलेले पथदिवे दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आले असून कंत्राटदाराकडून त्याबाबत दररोज आढावा घेतला जात आहे. सीमाभागातील अनेक वस्त्यांमध्ये रस्त्यांवरील बंद दिव्याचे प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणी कामे सुरू आहेत. शहरातील विविध भागात एलएडी दिवे लावण्याचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाला असून ती केली जाईल.

– सुनील अग्रवाल, सभापती नगररचना विभाग, महापालिका