*    नवीन गाणी फार काळ टिकणारी नाहीत

*   सूरमणी पं. प्रभाकर धाकडे यांची खंत

सुगम संगीताकडे नव्या पिढीचा वाढता ओढा बघता मूळ शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. शास्त्रीय संगीत हा गाभा असून हल्ली जी काही नवीन गाणी सादर केली जात आहेत, ती फार काळ टिकणारी नसल्याचे मत ज्येष्ठ संगीततज्ञ आणि व्हायोलिनवादक सूरमणी पं. प्रभाकर धाकडे यांनी व्यक्त केले.

पं. प्रभाकर धाकडे ‘लोकसत्ता’शी बोलत होते. गेल्या काही वषार्ंत सुगम संगीताचे  कार्यक्रम वाढले आहेत. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम मात्र कमी झाले आहेत. पूर्वीसारख्या शास्त्रीय संगीताच्या बैठकी आता होत नाहीत. शास्त्रीय संगीताचा रियाझ करण्यासाठी मेहनत आणि चिकाटी लागते. ती आता नव्या पिढीमध्ये राहिली नाही. पूर्वी चित्रपटातील गाणी शास्त्रीय संगीताचा आधार घेऊन तयार केली जात होती आणि त्या गाण्यामध्ये गोडवा असायचा आज मात्र, पाश्चात्य आणि भारतीय संगीताचे मिश्रण करून गाणी तयार केली जात आहेत. तशी गाणी फार काळ टिकणारी नाही. पूर्वीची गाणी ही बंदीशीसारखी वाटायची. मात्र, आता संगीताचा बाज बदलला. त्यामुळे गाण्याचे स्वरूप बदलले आहे. दूरदर्शनवरील रिअ‍ॅलिटी शोमुळे सुगम संगीत शिकणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून समोर येणाऱ्या कलावंताची मेहनत करण्याची तयारी नाही, त्यामुळे या क्षेत्रात फार काळ राहत नाही. मुळात तानपुरा घेऊन रियाझ करणाऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या काही दिवसात अत्याधुनिक साधनामुळे चालता बोलता रियाझ केला जात आहे आणि त्यातून कलावंत घडविले जात आहेत.

रिअ‍ॅलिटी शोमुळे पैसा आणि प्रसिद्धी मिळायला लागल्यामुळे त्यात मूळ गाणे मात्र संपत चालले आहे. संगीताचे शिक्षण देताना मुळात पालकांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. पूर्वीपेक्षा गायन शाळांची संख्या वाढली आहे. विशारद झाले की गायन शाळा सुरू केल्या जातात. मात्र, आपण काय आणि कसे शिकवितो याचा विचार होणे गरजेचे आहे. केवळ परीक्षा देण्यापुरते विद्यार्थी घडविले जात असून शास्त्रीय संगीताविषयी जागृती वाढली आहे. चांगले तानसेन तयार होत नसले तरी कानसेन मात्र तयार केले जात आहेत आणि ती शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने चांगली बाब आहे. संगीताचे शिक्षण घेऊन पुण्या-मुंबईमध्ये स्थायिक झालेले विदर्भातील अनेक कलावंत समोर येऊ लागले आहेत, त्याचे कारण म्हणजे त्यांना वेगवेगळ्या व्यासपीठावर मिळणारी संधी. त्या ठिकाण मोठय़ा प्रमाणात स्पर्धा आहे. बाहेरून आलेले अनेक कलावंत मुंबईत स्थायिक झाले ते केवळ त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच. सुगम संगीत कार्यक्रमामुळे गेल्या काही दिवसात वेगवेगळी वाद्ये वाजवणाऱ्यांना चांगले दिवस आले असून अनेकांचे संसार त्याच्यावर आहेत, त्यामुळे संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर ते रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले आहे, असे पं. प्रभाकर धाकडे म्हणाले.

गुरूंप्रति श्रद्धा दिसत नाही

गुरू-शिष्य परंपरेबाबत फार बोलले जात असले तरी आज मात्र संगीताच्या क्षेत्रात गुरूंच्या प्रति फार श्रद्धेने बघितले जात नाही. केवळ कामापुरते गुरूंकडे संगीताचे शिक्षण घेतले जाते. पूर्वीच्या काळी गुरू रियाझ करीत असताना शिष्य त्यांच्या समोर बसून श्रवण करीत होते. मुळात गुरुंप्रति जी श्रद्धा असावी लागते ती आज दिसत नाही, अशी खंत पं. प्रभाकर धाकडे यांनी व्यक्त केली.

 

विदेशात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत

विदेशामध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेक संगीतकारांनी विदेशात अ‍ॅकॅडमी सुरू केल्या आहेत. व्हायोलिन शिकण्यासाठी विदेशातील विद्यार्थी नागपुरात येत आहेत. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, श्रीलंका, जपाननमधील अनेक विद्यार्थी या ठिकाणी संगीताचे शिक्षण घेण्यासाठी येतात. आज अत्याधुनिक साधनामुळे सर्व सोयी उपलब्ध झाल्या असताना काही त्या माध्यमातून संगीताचे शिक्षण घेतात. पुढील आठवडय़ात ऑस्ेट्रलियाचा एक विद्यार्थी व्हायोलिन शिकण्यासाठी येत आहे.

-पं. प्रभाकर धाकडे