‘रायन’ घटनेचे नागपुरातही पडसाद; व्यवस्थापनाकडूनही सुरक्षेवर लक्ष केंद्रित

गुडगाव येथील रायन स्कूलमधील एका विद्यार्थ्यांच्या हत्येमुळे नागपुरातील सीबीएसई शाळेत मुलांना पाठवणाऱ्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून पाल्याच्या सुरक्षेच्या संदर्भात शाळा प्रशासनाला ते प्रश्न विचारू लागले आहेत.

रायन स्कूलमधील प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले असून सीबीएसई शाळांतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागपुरातही पालकांनी मुलांच्या शाळेत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय सोयी आहेत, स्कूलबसचे चालक आणि वाहक यांची चौकशी, स्कूलमधील शौचालयांची स्थिती याविषयी संबंधित शाळांना विचारणा सुरू केली आहे. यासंदर्भात रायन आंतरराष्ट्रीय समूह संचालित नागपुरातील सेंट झेवियर्स शाळेतील मुलांच्या पालकांनी बुधवारी प्राचार्याशी भेट घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांना फाटकावरच अडवण्यात आले मात्र, नंतर पालकांनी त्यांचे म्हणणे मुख्याध्यापक शशिबाला धोटेकर यांच्यापुढे मांडले. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नसल्याची ग्वाही धोटेकर यांनी यावेळी दिली. मात्र, पालकांनी भीतीपोटी तसेच भूतकाळात घडलेल्या काही घटनांच्या अंगानेही विचारपूस केली. त्यात रागवणारे शिक्षक, मुलांच्या स्कूलबसमधील चालक व वाहक, शौचालयातील सुरक्षा आदी मुद्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. वर्गात आग लागली तर आपत्ती व्यवस्थापनाविषयी कोणत्या सोयी आहेत. पाण्याच्या टाकीपर्यंत मुले जाऊ शकतात काय? टाकीचे झाकण खुले की बंद? याविषयीही पालकांनी विचारपूस केली. शाळेत कोणत्याही प्रकारच्या अडचणी नसल्याची ग्वाही, प्रशासनाने यावेळी दिली.

इतरही सीबीएसई शाळेने गुडगाव घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. मुलांना त्यांच्या वर्गापर्यंत सोडायला व घ्यायला जाणाऱ्या पालकांना काही शाळांनी प्रवेशद्वारापर्यंतच येण्यास सांगितले. मुलांच्या दप्तराची तपासणी केली जात आहे. दरम्यान, यासंदर्भात शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याशी संपर्क साधण्यास विचारणा केल्यास त्यांनी बोलण्यास नकार दिला.

पालकांनी मुलांना निर्धास्तपणे शाळेत पाठवावे. शाळेत सर्व प्रकारच्या सोयी आहेत. तरीही जी काही कमतरता असेल ती येत्या १५ दिवसांत भरून काढण्यात येईल. पालकांना किंवा पाल्याला कुठल्याही प्रकारच्या समस्या असल्यास त्यांनी नि:संकोचपणे शिक्षकांना किंवा मला विचाराव्यात. मुलांना शाळेत पाठवताना पालकांनी संकोच बाळगू नये.

शशिबाला धोटेकर, मुख्याध्यापक, सेंट झेवियर्स हायस्कूल

सकाळी नऊ वाजता मुलाला शाळेच्या व्हरांडय़ापर्यंत सोडून देऊन मी ऑफिसला जात असतो. मात्र, सोमवारपासून शाळेचे शिपाई फाटकातूनच मुलांना आत घेतात. मला आत येऊ देत नाहीत. त्यांना विचारले तर नियम ‘स्ट्रिक्ट’ केले म्हणतात. मुलाला १२ वाजता शाळेतून आणतानाही हीच समस्या. मुलगा नेमका शाळेत काय करतो, हे पहायचे असते, पण तीन दिवसांपासून बाहेरूनच परत फिरावे लागत आहे.

सुनील सायरे, पालक, प्रेरणा कॉन्व्हेंट

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर शाळांनी गंभीर व्हावे आणि तशी अंमलबजावणी करावी. बसचे चालक, वाहक, वाशरूम, मुलांना शिक्षकांकडून मिळणारी वाईट वागणूक, क्रीडाच्या नावावर अतिरिक्त शुल्क, पिण्याचे स्वच्छ पाणी, पालक समिती बनवणे अशा विविध विषयांवर सेंट झेवियर्समध्ये चर्चा झाली.

शैलेंद्र तिवारी, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस</strong>