गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरूंगात असलेले ‘सहारा’ समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांची गेल्या आठवडय़ात पॅरोलवर सुटका करण्यात आली असून, अजूनही त्यांची मिजास कायम आहे. मंगळवारी सकाळी रॉय यांचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंतराष्ट्रीय विमानतळावर खासगी विमानाने आगमन झाले. तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी बरीच गर्दी दिसून आली.
गुंतवणुकदारांचे २० हजार कोटी रुपये थकवल्याच्या एका प्रकरणात ६५ वर्षीय सुब्रतो रॉय तिहार करागृहात शिक्षा भोगत आहेत. मार्च २०१४ पासून ते तिहार तुरुंगामध्ये असून तेथे त्याचा जसा थाट आहे तसाच थाट कारागृहाबाहेर देखील कायम असल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी रॉय यांचे विमानतळावर खासगी विमानाने आगमन होताच ‘सहारा’ परिवारातर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पुष्पगुच्छे देणाऱ्यांची रांग लागली होती. तगडय़ा बंदोबस्तामध्ये रॉय विमानतळावरुन हॉटेल ‘रेडिसन ब्लू’कडे रवाना झाले. त्यांच्यासाठी शानदार ऑडी कारची व्यवस्था करण्यात आली होती. गाडीच्या समोर आणि मागे सुरक्षा रक्षकांचा ताफा होता. तर समोर सहारा परिवाराच्या सदस्यांची दुचाकी रॅली काढण्यात आली होती. गाडी हॉटेलमध्ये पोहचताच सुरक्षारक्षकांच्या गराडय़ातच रॉय हॉटेलमध्ये दाखल झाले. काही मंडळींनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले. एखाद्या सेलिब्रेटीच्या शानेत त्यांचा वावर होता. त्यांना भेटणाऱ्यांची गर्दी होती. डॉटेलमध्ये प्रवेश करताच ते थेट आपल्या खोलीकडे रवाना झाले. त्यांच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे दुपारी १ वाजेपासून त्यांनी जामठा येथील राणीकोठी येथे महाराष्ट्रातील सहारा परिवारातील सर्व सदस्यांना एक बठकीत सहभागी होऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर सायंकाळी खासगी विमानाने लखनौकडे रवाना झाले.
न्यायालयीन कोठीत असलेल्या रॉय यांना तिहार कारागृहात सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत. तुरुंगात त्यांना सर्वात महागडय़ा अशा एका कोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये ठेवण्यात आले आहे जेथे विशेष थाट पुरवण्यात येतो. आठ एसी, सीसीटीव्ही कॅमेरा, टीव्ही, मिनरल वॉटर, इंटरनेट, व्हिडिओ कॉन्फरिन्सग, पंचतारांकित हॉटेलचे जेवण, आयएसडी दूरध्वनीची सोय त्यांना पुरवण्यात येते. रॉय यांचा तिहार कारागृहातील दिवसाचा खर्च तब्बल ७० हजार रुपये एवढा आहे हे विशेष!