आघाडी सरकारच्या काळात राज्यपालांनी ठरवून दिलेल्या सूत्रानुसारच निधी वाटप झाले. विदर्भाच्या वाटय़ाचा सिंचनाचा एक रुपयाही वळवला नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. निधी पळविल्याचा आरोप करणारे आता सत्तेत आहेत. त्यांनी यासंदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले.

नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनी दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात विदर्भातील सिंचन प्रकल्पाचा हजारो कोटींचा निधी पश्चिम महाराष्ट्रात वळवल्याचा आरोप केला होता. त्याकडे तटकरे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी हा आरोप फेटाळून लावला. राज्यपालांच्या सूत्रानुसारच निधी वाटप झाल्याचा दावा करताना त्यांनी त्यावेळी असे आरोप करणारे आता सत्तेत आहेत. त्यांनीच वस्तुस्थिती जाहीर करावी. आघाडी सरकारच्या काळात विदर्भाचा विकास करण्यासाठी प्रयत्न झाले. १९९९ मध्ये नागपूरच्या रस्त्यांसाठी ३५० कोटी रुपये देण्यात आले होते. मिहानची सुरुवातही आघाडी सरकारच्या काळातच झाली. सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्यात आली होती. त्यात राज्यातील सिंचनक्षेत्रात झालेली वाढ दर्शविण्यात आली आहे. राज्याच्या कृषी उत्पादनात झालेली वाढ, हे त्याचे प्रमाण आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गत निवडणुकीत पक्षाला या भागात यश मिळाले नाही, असे म्हणणे योग्य नाही. मोदी लाटेमुळे आम्ही पराभूत झालो, असा दावा त्यांनी केला.

भाजप-शिवसेनेतील अंतर्गत धुसफुशीवरही त्यांनी टीका केली. सेनेच्या मुखपत्रात नागपूरच्या खड्डय़ांवर टीका केली जाते, तर मुंबईत भाजप तेथील महापालिकेतील भ्रष्टाचार वेशीवर टांगत आहेत.

सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेलाही त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागेल. सत्ताधारी पक्षातील दोन्ही पक्षातील अंतर्गत विरोधाचा परिणाम शासकीय यंत्रणेवर होत असून त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना प्रशासन त्यांचे ऐकत नाही, अशी कबुली द्यावी लागते. राज्याच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे, असे ते म्हणाले.

सरकार शेतकरीविरोधी

राज्यातील युती सरकार शेतकरीविरोधी आहे. धान, कांदा व कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. राज्यात दुष्काळ असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नाही. शेतमालाच्या किमती वाढविण्यात आलेल्या नाहीत, गोरगरीबांना अन्नसुरक्षेचा लाभ मिळत नाही असा आरोप त्यांनी केला.

विदर्भाच्या मुद्यावर तळ्यात-मळ्यात

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर राष्ट्रवादीची भूमिका तळ्यात मळ्यातच आहे. ‘विदर्भाच्या जनतेला जे मान्य असेल ते आम्हाला मान्य राहील’, असे तटकरे म्हणाले, विदर्भाच्या जनतेला काय मान्य आहे, हे कसे कळेल, असे त्यांना विचारले असता, ते सरकारने ठरवावे, असे ते म्हणाले. पक्षाचे स्थानिक नेते वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ आहेत, असे त्यांना विचारले असता, आम्ही सर्व मतांचा आदर करतो, असे ते म्हणाले. या मुद्यावर सेना-भाजपमध्येही मतभेद आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.