साहित्यिक, कलावंतांनी भूमिका घेण्याची गरज-डॉ. सुनीती देव

या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत आहे. सत्य सांगण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत नाही. गेल्या तीन वर्षांपासून नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी सापडत नाहीत. एकूणच देशात सध्या प्रतिकूल वातावरण आहे, असे प्रतिपादन डॉ. सुनीती देव यांनी केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने ‘सद्यस्थितीत कलावंत, साहित्यकांची भूमिका आणि जबाबदारी’ या विषयावर रविवारी परिसंवाद कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे पार पडला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील तत्वज्ञान विभागाच्या माजी प्रमुख डॉ. सुनीती देव यांचे अध्यक्षीय भाषण झाले.

साहित्यिक, कलावंत यांनी भूमिका घेणे म्हणजे नेमके काय या मुद्यांवर बोलताना देव यांनी देशातील सध्याच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच साहित्यिक आणि कलावंतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असेल तर त्याविरोधात धाडसाने बोलले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सत्य सांगण्यासाठी लागणारे व्यासपीठ उपलब्ध असणे आवश्यक आहे. पण ते अलिकडे दिसत नाही. राम गणेश गडकरी यांनी कितीतरी वर्षे आधी लिहून ठेवलेल्या मजकुराला आक्षेप घेऊन काही माथेफिरू त्यांचा पुतळ्याची मोडतोड करतात. हे अयोग्य आहे. नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी तीन वर्षे झाले तरी सापडत नाही. बुद्धिजीवी वर्गाला हतबल झाल्यासारखे वाटणे, सर्वसामान्य जनतेला, साहित्यिक, कलावंतांना त्यांचे दैनंदिन कामात अडचणी येणे हे अतिशय धोकादायक आहे. काही दिवसांपासून समाजाचा श्वास कोंडतो आहे आणि हुकूमशाहीत नव्हे तर लोकशाहीत घडत आहे, अशी टीका विद्यमान सरकारावर देव यांनी केली.

साहित्यिक समाजाचा आरसा आहे तर समाजातील बदलाचे प्रतिबिंब त्यात उमटणे अपरिहार्य आहे. परंतु साहित्यिक, कलावंतांमध्ये भूमिका घेण्याबद्दल दोन टोकाचे मतप्रवाह आहेत. एक भूमिका घेतलीच पाहिजे हा तर दुसरा मतप्रवाह आम्ही साहित्यिक, कलावंत आपल्या विश्वात असतो, आम्हाला भूमिका घेणे बंधनकारक नाही, असा आहे. परंतु भूमिका घेणे म्हणजे काय तर दडपशाहीच्याविरोधात बोलता आले पाहिजे. सत्याची सैदव कास धरली पाहिजे. हे करत असताना कृती, बोलणे आणि लेखण समान असले पाहिजे. नाही तर एकीकडे व्यवस्थेविरोधात गळे काढायचे आणि दुसरीकडे व्यवस्थेचेच फायदे उपटायचे. हा दांभिकपणा साहित्यिक, कलावंतांना चालणारा नाही. तटस्थ राहता आले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, पत्रकार श्रीपाद अपराजित, इतिहास संशोधक डॉ. अशोक राणा यांची भाषणे झाली. संचालन ख्वाजा रब्बानी यांनी केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील यांनी आभार मानले.