नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना केंद्रात सत्ता आल्यावर ते आणखी मोठय़ा पदावर जाणार असे वाटत होते. परंतु अंतर्गत घडामोडींमुळे ते या पदापर्यंत पोहोचू शकले नाही, अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. नितीन गडकरी यांच्या षष्टय़ब्दीपूर्ती गौरव सोहळ्यात ते बोलत होते.

या वेळी शरद पवार म्हणाले, देशात विकासात दळणवळण साधनांची महत्त्वाची भूमिका आहे, तेव्हा गडकरी हे देशाच्या विकासाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावत असून एका मराठी माणसाकरिता ती अभिनंदनाची बाब आहे. रामदास आठवले यांनीही  भाषणात गडकरींचे कौतुक केले.

अमित शहा अनुपस्थित

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व अध्यात्म गुरू श्री श्री रवीशंकर यांची अनुपस्थिती सगळ्यांना खटकली. आयोजकांनी श्री श्री रवीशंकर यांची गडकरींना शुभेच्छा देणारी चित्रफित उपस्थितांना दाखवली, परंतु अमित शहा यांचा उल्लेखही टाळण्यात आला. व्यासपीठावर शिवसेनेच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

नारायण राणे हिरमुसले..

काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे नितीन गडकरींच्या गौरव कार्यक्रमाकरिता आले असताना व्यासपीठावर पहिल्या रांगेत त्यांना जागा देण्यात आली. गेल्या काही दिवसात राणे आणि गडकरी यांची जवळीक बघता त्यांचे भाषण ऐकण्याची सगळ्यांना उत्सुकता होती, परंतु आयोजकांनी राणे यांना बोलण्याची संधी दिली नाही, त्यामुळे त्यांचा चेहरा पडला होता.