राज्यात २३० मृत्यू, महिलांची संख्या अधिक; प्रथमच उन्हाळ्यात आजाराचा विळखा

एरवी थंडीमध्ये आढळणाऱ्या स्वाइन फ्लूने प्रथमच उन्हाळ्यातही राज्याच्या काही भागात विळखा घातला आहे. १ जानेवारी ते ५ जून २०१७ दरम्यान स्वाइन फ्लूने राज्यात २३० मृत्यू झाले. यात ११४ पुरुष तर ११६ महिलांचा समावेश आहे. राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाल्यामुळे तापमानात घट झाली. तरीही रुग्ण आढळून येत आहेत.

महाराष्ट्रासह देशातील काही भागांत वाढलेल्या स्वाइन फ्लू मृत्यू संख्येमुळे चिंता वाढली आहे. सहा महिन्यात राज्यात १ हजार २०२ रुग्ण आढळले असून त्यातील २३० जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलेची संख्या २ ने जास्त आहे. १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लू म्हणून ओळखला जाणारा स्वाईन फ्लू प्रत्येक ५ ते १० वर्षांने परत येतो.२००९ मध्ये अनेक देशांमध्ये याची साथ पसरली होती. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने संपूर्ण जगाला याबाबत अतिदक्षतेचा इशारा दिला होता. या वर्षी भारतात २७ हजार जणांना याची लागण होवून ९८० जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अधूनमधून स्वाइन फ्लू विषाणूंनी ‘एच १ एन १, एच १ एन २, एच २ एन ३, एच ३ एन १’ हे गुणधर्म बदलत देशासह राज्याच्या विविध भागात थैमान घातले. २०१५ पर्यंत स्वाइन फ्लूची बाधितांची संख्या ५२ हजार ५४० होती. यापैकी ३ हजार ११८ जणांचा मृत्यू झाला. भारतात आजपर्यंत केवळ थंडीच्या काळात  हे रुग्ण आढळून येत असत. यंदा प्रथमच उन्हाळ्यातही बाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात आढळून आली आहे. विषाणूमधील बदलाचे हे संकेत मानले जाते.  हा अभ्यास पुण्यातील एनआयव्ही संस्थेत शक्य आहे, परंतु अद्याप काहीही पुढे आले नाही. सार्वजनिक आरोग्य विभागही याबाबतीत मौन बाळगून आहे.

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतही तपासणी नाही

राज्यात स्वाइन फ्लू बाधितांवर प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये व खाजगी रुग्णालयांत उपचार केला जातो. त्यातील मुंबई आणि नागपूरचे मेयो या शासकीय संस्थावगळता मोजक्याच संस्थेतच शासनाने पीसीआर उपकरण स्वाइन फ्लू तपासणीकरिता उपलब्ध केले आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांना इतर संस्थेच्या तपासणी अहवालावर अवलंबून राहावे लागते.

लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय

सर्दी, खोकला, वारंवार शिंका, घशात खवखव, थंडी वाजून ताप, अंगदुखी ही ‘स्वाइन फ्लू’ची लक्षणे आहेत. या रुग्णाने त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो. याची बाधा इतरांना होऊ नये म्हणून रुग्णाने एका खोलीतच आराम करणे, गर्दीत जाणे टाळणे, इतरांच्या संपर्कात न येणे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. हा रुग्ण केवळ स्वाइन फ्लूने दगावत नसून त्यामुळे फुफ्फुसावर होणारा घात व निमोनियामुळे त्याचा मृत्यू होतो.

दगावलेल्यांत २० मुले व ६ गर्भवती माता

‘स्वाइन फ्लू’मुळे दगावलेल्यांमध्ये १० वर्षांखालील २० मुलांचा समावेश असून त्यातील ८ मुले १ वर्षांखालील आहेत. ६ गर्भवती मातांचाही बळी या आजाराने घेतल्याची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागाकडे आहे.

संशोधनाला प्रोत्साहन देण्याची गरज -डॉ. अशोक अरबट

राज्यात प्रथमच स्वाइन फ्लूचे रुग्ण मोठय़ा संख्येने उन्हाळ्यात आढळले असून हे या विषाणूंतील गुणधर्मात बदलाचे संकेत आहे. यावर देशात फारसे संशोधन होत नसून विदेशातील संस्थेतील अभ्यासावरच आपली मदार आहे. देशात तातडीने या पद्धतीच्या आजारावरील संशोधनाकरिता जास्त लक्ष घालण्याची गरज आहे; जेणेकरून वेळीच आजारावर लस उपलब्ध होऊ शकेल.  डॉ. अशोक अरबट, आंतरराष्ट्रीय सीओपीडी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य, नागपूर

उन्हाळ्यात प्रथमच स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. एनआयव्ही प्रयोगशाळेतील अभ्यासात स्वाइन फ्ल्यूच्या विषाणूत कोणतेही बदल झाल्याचे निदर्शनास आले नाही. मात्र तापमानात घट झाल्याने राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांना अतिदक्षतेचा इशारा देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  डॉ. सतीश पवार, संचालक, आरोग्य विभाग

untitled-10