पुन्हा नव्याने निविदा?

उपराजधानीतील प्रतिभावंत धावपटू वर्षांनुवष्रे ‘सिंथेटिक ट्रॅक’च्या प्रतीक्षेत आहेत. दरवेळी आशेचा किरण पल्लवित होतो आणि अखेर पदरी ती निराशा पडते. सहा महिन्यांनपूर्वी माणकापूर येथील क्रीडासंकुल परिसरात सिंथेटिक ट्रॅकच्या कामाला जोमात सुरुवात झाली. लवकरच खेळाडूंना सिंथेटिक ट्रॅकवर धावण्याची संधी मिळेल असे चित्र होते. मात्र ज्या कंपनीला सिंथेटिक ट्रॅकचे कंत्राट देण्यात आले त्या कंपनीने ट्रॅकचे काम पूर्ण करण्यास नकार दिला आहे. यासाठी लागणारा मुरुम आणि वाळूचा खर्च परवडणार नसल्याचे कंपनीने क्रीडा संचालक कार्यालयाला पत्राव्दारे कळविले आहे. त्यामुळे शासनाने सवलतीच्या दरात ते उपलब्ध करुन दिल्यास पुढील काम करण्यात येईल असेही त्या पत्रात म्हटले आहे. मात्र, असे अजब पत्र कंत्राटदाराकडून प्राप्त झाल्याने विभागीय क्रीडासंकुल समितीला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

‘ऑरेंज सिटी’ अशी ख्याती असलेल्या या शहराने गेल्या दशकात अनेक मध्यम आणि लांब पल्ल्याचे धावपटू दिले. धावण्याच्या व सरावाच्या पुरेशा सुविधा नसताना या धावपटूंनी मेहनतीच्या तसेच प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरीचा उत्तम ठसा उमटवला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा सिंथेटिक ट्रॅकवर होत असल्याने या खेळाडूंना परिस्थितीशी सांगड घालताना फार त्रास जाणवतो. खेळाडूंना होत असलेल्या यातना वारंवार शासन दरबारी ठेवण्याचा प्रयत्न झाला. पण प्रत्यक्षात सिंथेटिक ट्रॅकची निर्मिती ही कुठल्या ना कुठल्या करणांमुळे रखडतच गेली. कधी आíथक तरतुदीचा अभाव तर कधी यासाठी मोठय़ा प्रमाणावर लागणाऱ्या वाळूच्या अनुपलब्धतेचे कारण पुढे करीत वेळ काढूपणा होत राहिला.

विभागीय क्रीडासंकुल परिसरात १७ कोटी रुपये खर्चाच्या ट्रॅकचे भूमिपुजन २०११ मध्येच झाले. १८ महिन्यात ट्रॅक पूर्ण करण्याचा करार झाला होता. पण ट्रॅक बनविणारी दिल्ली येथील ‘इन्फ्राटेक प्रा. लि’ ने कामाकडे दुर्लक्ष केल्याने संकुल समितीला करार मोडित काढावा लागला. नंतर नागपूर सुधार प्रन्यासाकडे हे काम सोपविण्यात आले. नागपूर सुधार प्रन्यासने निविदा काढत हे काम पूर्ण करण्यास नागपूर येथील मुसळे एॅण्ड मुसळे कंपनीला कंत्राट दिले. काही दिवस सिंथेटिक ट्रॅकचे काम सुरु राहिले. मात्र मागील महिन्यापासून कंपनीने काम बंद केले. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन लागणारी वाळू, मुरुम व गिट्टी कमी दरात आम्हाला उपलब्ध करुन द्यावी, अशी अजब अट घातली मात्र, क्रीडा संचालक कार्यालयाकडून ट्रॅकचे बंद पडलेले काम लवकर सुरु करण्याची विनंती कंपनीला पत्राव्दारे करण्यात आली. कंपनीकडून कोणतेच उत्तर मिळत नसल्याने आता नव्याने निविदा काढण्याचा निर्णय नागपूर सुधार प्रन्यास कडून घेण्यात येत असल्याची महिती सुत्रांनी दिली. शिवाय क्रीडासंकुल समितीच्या म्हणण्यानुसार निविदा काढताना त्यात ट्रॅक पूर्ण करण्याच्या सर्व अटी टाकण्यात आल्या आहेत, सर्व अटी मंजूर करवून घेण्याआधीच कंपनीला कंत्राट देण्यात आले. त्यानुसार कंपनीने ट्रॅकचे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र कंपनीने हे कंत्राट पूर्ण करण्यास नकार दिला तर सदर कंपनीचे नावं काळ्या यादी समाविष्ट करण्यात येऊ शकते असेही नागपूर सुधार प्रन्यासकडून सांगण्यात आले.

अंतिम निर्णय लवकरच

बंद पडलेल्या सिंथेटिक ट्रॅकचे काम लवकर सुरु करण्यासाठी आम्ही कंत्राट मिळालेल्या कंपनीला अनेक पत्र पाठविली मात्र, अद्याप कोणत्याच पत्राचे उत्तर आम्हला मिळाले नाही. यासंदर्भात २२ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याबरोबर क्रीडासंकुल समितीची बठक होणार आहे. बठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. नकार मिळाल्यास नव्याने विनिदा निघण्याची शक्यता आहे अथवा कंत्राटी कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची तरतूद देखील आहे.

– सुभाष रेवतकर,  विभागीय क्रीडा उपसंचालक