आमदार तानाजी सावंत यांचा शिवसैनिकांना सल्ला

संघटनात्मक नियोजन आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे महापालिका निवडणुकीत यश मिळू शकले नसले तरी येणाऱ्या दिवसात बुथ पातळीपासून संघटनात्मक बांधणी करायची असेल तर भारतीय जनता पक्षाचे अनुकरण करा, असा सल्ला शिवसेनेचे नेते आणि नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांनी दिला.

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची शिवसेना कार्यालयात बैठक आयोजित केली असताना ते कार्यकर्त्यांंसमोर बोलत होते. महापालिकेच्या निवडणुकीनंतर उपराजधानीत शिवसेनेला मिळालेले अपयश बघता ही चिंतन बैठक आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली असताना अन्य जिल्ह्य़ातील निवडणुकीची जबाबदारी असल्यामुळे नागपुरात वेळ देऊ शकलो नाही. त्यामुळे कार्यकत्यार्ंची नाराजी असणे अपेक्षित आहे. मात्र, संपर्क प्रमुख म्हणून जे काम करणे आवश्यक होते ते केले होते. संपर्क प्रमुख वाडय़ावर जाऊन ‘सेंटीग’ करत असतात असा आरोप केला जात असला तरी गेल्या ४० वर्षांच्या काळात कुणापुढे नतमस्तक झालो नाही. शिवसैनिक म्हणून पक्षप्रमुखांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याचा प्रयत्न केला. जी यादी तयार केली त्याप्रमाणे बीफॉर्म दिले, शिवसेनेचा पोस्टमन म्हणून काम करीत असून निर्णय मात्र शिवसेना प्रमुख घेतात त्यामुळे उमेदवारी देताना कुठलाही घोळ झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीत आलेले अपयश कार्यकर्त्यांना पचवता आले पाहिजे मात्र आता यानंतर संगटनात्मक वाढविण्यावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा. नागपुरात भाजपने ज्या पद्धतीने संघटनात्मक बांधणी केली तशीत संघटनात्मक बांधणी केली तर त्यात काही वावगे नाही. मुंबईला येऊन शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कसे काम करतात, त्यांची संघटनात्मक बांधणी कशी आहे हे सुद्धा बघायला आले पाहिजे. नागपुरात निवडणुकीच्या काळात नियोजन आणि कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे आणि एकेमकाचे पाय ओढण्याचे प्रकार झाल्यामुळे शिवसेनेला अपयश आले आहे. जे शिवसैनिक पक्षविरोधी काम करीत असेल अशा शिवसैनिकांची नावे समोर आणा आणि त्यांना पक्षातून बाहेर काढत घरता रस्ता दाखविला जाईल, असा इशारा यावेळी सावंत यांनी दिला. यावेळी माजी खासदार प्रकाश जाधव, नगरसेवक किशोर कुमेरिया, जिल्हाध्यक्ष सतीश हरडे, शेखर सावरबांधे, मंगेश काशीकर, बंडू तळवेकर आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या निवडणुकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थितांनी संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. शिवसैनिक काम करायला तयार असले तरी नियोजन आणि मार्गदर्शक नसल्यामुळे नागपुरात गेल्या तीन वर्षांत शिवसेना वाढली नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असून बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना स्थान दिले जात असल्यामुळे शिवसैनिकांचा पक्षात सन्मान राहिला नाही. नियोजन आणि संघटनात्मक काम नाही. त्यामुळे शिवसेनेला नागपुरात हे दिवस बघायला मिळत आहे, अशा अनेक भावना यावेळी कार्यकर्त्यांनी संपर्कप्रमुखासमोर मांडल्या.