फेऱ्या कमी, महापालिकेकडून उचल अधिक
 मुबलक पाणीसाठा असूनही अनेक वस्त्यांमध्ये टंचाई
शहराला उन्हाळ्यात पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असताना गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रभागांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे खासगी टँकरमालक सक्रिय झाले आहेत. गेल्या चार महिन्यांत शहरातील विविध भागात तीन हजारांपेक्षा जास्त फेऱ्या केल्याची नोंद असताना प्रत्यक्षात मात्र अनेक वस्त्यांमध्ये टँकर पोहोचलेच नसून टँकरचालकांनी मात्र महापालिकेकडून लाखो रुपयांची उचल केली आहे. खासगी टँकरचालकांची मनमानी सुरू असून काही टँकरचालक महापालिकेच्या जलकुंभावरून पाणी भरतात, ते बाहेर विकतात आणि महापालिका प्रशासनाचे मात्र त्याकडे लक्ष नसल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाण्याच्या प्रश्नावरुन गदारोळ झाला असताना टँकरचालकांची मनमानी आणि नागरिकांकडून पाण्यासाठी पैसै घेत असल्याचे प्रकरण समोर आले. शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जबाबदारी महापालिका आणि ओसीडब्ल्यूकडे असली तरी शहरात टँकरच्या माध्यमातून रोज किती पाणी पुरवठा केला जातो, मागणीनुसार किती फेऱ्या केल्या जातात याची नोंदच नाही.
दक्षिण, पश्चिम, पूर्व, दक्षिण आणि उत्तर नागपुरातील काही भागात पाणी समस्या अद्याप दूर झालेली नाही. यंदा एप्रिल महिन्याच्या प्रारंभी उन्हाचा तडाखा जाणवत असताना नगरसेवकांच्या माध्यमातून टँकरची मागणी केली जाते परंतु, वस्त्यामध्ये टँकर वेळेवर पोहचत नाही. महापालिका आणि ओसीडब्ल्यूची टँकरची स्वतंत्र व्यवस्था असताना काही खासगी टँकरचालकांची मनमानी सुरू झाली असून पैसे देऊन पाण्याचे टँकर दिले जात आहे. शहरातील विविध भागात रात्रीच्या टँकरच्या फेऱ्या केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यात आतापर्यंत टँकरच्या फेऱ्याची संख्या ४३० च्यावर गेली असल्याची नोंद आहे मात्र, प्रत्यक्षात इतका पाणी पुरवठा झाला का याची शहनिशा मात्र केली जात नाही आणि त्याचा फायदा कंत्राटदार घेत आहेत. महापालिकेने ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍ससोबत करार केला होता, त्यावेळी नेटवर्किंग आणि नॉननेटवर्किंग असे दोन भाग केले होते. शहरातील बहुतेक पाण्याच्या टाक्यांमध्ये मुबलक पाणी पुरवठा असताना शहरातील विविध भागात अपेक्षेपेक्षा टँकरची संख्या वाढली कशी? असा प्रश्न उपस्थित करून यामध्ये मोठा घोळ असून याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे यांनी केली. नॉन नेटवर्किंग भागात गरज नसताना टँकरच्या फेऱ्या वाढल्या असून एवढे पाणी जाते कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

चौकशी करणार
शहरात ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई आहे त्या ठिकाणी टँकरचा पुरवठा केला जात आहे. अधिकृत वस्त्यांमध्ये टँकर देण्याची जबाबदारी ओसीडब्ल्यू तर अनधिकृत वस्त्यांमध्ये महापालिकेची आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता आणि मागणी होत असेल तर टँकर पाठविले जात आहे. फेऱ्या कमी आणि जास्त पैसे उचलले जात असेल आणि त्याबाबत काही पुरावे समोर आले तर चौकशी करण्यात येईल.
संदीप जोशी, सभापती, जलप्रदाय विभाग