डॉ. मदन कुळकर्णी यांची खंत

साहित्य क्षेत्रात वेगवेगळे प्रवाह आणि ज्ञान शाखा आहेत, साहित्याच्या दृष्टीने मात्र त्यांचा उपयोग होत नाही. अध्यापनाच्यादृष्टीनेही त्यांचा अभ्यास केला जात नाही, त्यामुळे मराठी साहित्यामध्ये अनेकदा पुनरावृत्ती होते. साहित्य अध्यापनासाठी शिक्षक समृद्ध असले पाहिजे. त्यादृष्टीने चांगले शिक्षक निर्माण होत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. मदन कुळकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

साहित्य क्षेत्रात समीक्षेच्या दृष्टीने नवीन पिढी तयार होत नाही, त्यादृष्टीने प्रयत्नही केले जात नाहीत. मुळात शिक्षक साहित्याच्यादृष्टीने समृद्ध असणे गरजेचे आहे. मात्र, त्यादृष्टीने अभ्यास केला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कथेचे वेगवेगळे वैशिष्टय़ आहे. दीर्घ कथा कशाला म्हणावी हा गेल्या काही दिवसात वादाचा विषय झाला आहे. दीर्घकथा ही जीवनातील खंडाशय मांडते तर कादंबरी जीवनाचे व्यापक दर्शन घडवित असते. इंग्रजी भाषेचा बोलबाला होत असला तरी अनेकांना चांगले इंग्रजी बोलता येत नाही, असे डॉ. कुळकर्णी म्हणाले.

साहित्य व्यवहारात चांगल्या गुणवत्तापूर्ण साहित्य कृतीची निर्मिती महत्त्वपूर्ण ठरते. तशीच चांगल्या समीक्षा व संशोधन क्षेत्राचीही गरज असते. आंतरज्ञान,  शास्त्रीय संशोधन, अध्यापनाचे महत्त्व वाढत आहे. या ज्ञानशाखांच्या कलाकृतींच्या विविधांगी दृष्टिकोणाचा उपयोग होऊ शकतो. तरीही प्रखर सामाजिक वास्तव मांडण्याच्या नादात साहित्य ही कला आहे, याकडे दुर्लक्ष झाले तर तिचे कलाकृतीत्व संपून ती एक समाजशास्त्रीय ग्रंथाचे रूप घेऊ शकते. व्यापक मराठी क्षेत्रात ग्रामीण, दलित, आदिवासी, साहित्य प्रवाहात अनेक कलाकृतीमध्ये सामाजिक वास्तवाबरोबरच कलामूल्य सांभाळल्याचेही दिसून येते. त्याचा विचार नव्या समीक्षक संशोधकांनी केला पाहिजे. साहित्य क्षेत्रात वेगवेगळे प्रवाह असताना त्यांची संमेलने आयोजित केली जातात. अशा प्रवाहात शिक्षण प्रसारामुळे अभावग्रस्त जीवन जगणारे वंचित स्तर पुढे येत आहेत. त्यांच्यामध्ये प्रज्ञा आणि प्रतिभा असताना ते उपेक्षित राहत आहेत. अशा विविध प्रवाहातील उपेक्षित असलेल्यांना साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आणण्याच्यादृष्टीने संमेलनातून चिंतनही मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

साहित्य प्रकारांमध्ये भर पडताना दिसत आहे. नव्या आशयासह नव्या अभिव्यक्तीच्या पद्धती स्वीकारल्याने विशिष्ट साहित्य प्रकाराला एक नवा उन्मेष प्राप्त होतो. हा उन्मेष मग स्वतच्या स्वतंत्र अस्तित्वाची मागणी करीत असतो. ती स्वीकारण्याची उदारता समीक्षकांनी दाखविली पाहिजे. मराठी वाङ्मय उगमापासून समृद्ध आहे. विविध धर्म पंथाच्या आधाराने ते समृद्ध झाले आहे. वाङ्मय हा सांस्कृतिक वारसा आहे. आता वंचित स्तर पुढे येत आहेत. त्यांच्याजवळ प्रज्ञा आणि प्रतिमा आहे. या साहित्याच्या धुळीतील ही प्रज्ञा कशी वेचता येईल त्या दृष्टीने विचार मांडला गेला पाहिजे, असे डॉ. कुळकर्णी म्हणाले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहण्याचा विचार गेल्या वर्षीच केला होता. साहित्य संघात विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. मात्र, त्यावेळी वेळ निघून गेली होती. त्यामुळे गेल्या वर्षीपासून निवडणुकीत उभे राहण्याची मानसिक तयारी केली होती आणि त्यादृष्टीने संपर्क केला जात होता. डॉ. अक्षयकुमार काळे निवडणुकीत उभे राहणार असल्याची कुणकुण मला लागली होती. मी निवडणुकीत उभा राहणार असून मला पाठिंबा द्या अशी विनंती मी त्यांना केली होती. निवडणुकीतील उमेदवार विरोधक असले तरी मी त्यांचा विरोधक म्हणून उभा नाही. माझ्यापरीने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जो काही पत्रव्यवहार आणि संपर्क करता येईल तो करणार आहे.

-डॉ. मदन कुळकर्णी