• राज्य माहिती आयोगाचा आदेश
  • कोराडीच्या तायवाडे महाविद्यालयातील प्रकरण

महाविद्यालयाच्याच एखाद्या प्राध्यापकाने तक्रार केल्याने प्राचार्याना दंड झाल्याची पहिलीच घटना नागपुरात घडली. माहिती न दिल्याने राज्य माहिती आयोगाने कोराडीच्या तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

केवळ ‘वेळापत्रक’ न दिल्याने संबंधित महाविद्यालयात याहीपूर्वी अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. विद्यापीठाच्या तक्रार निवारण समिती आणि त्यानंतर व्यवस्थापन परिषदेतही या महाविद्यालयाबाबत तक्रारी आलेल्या आहेत. सच्चिदानंद शिक्षण संस्थेद्वारा संचालित तायवाडे कला, वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक व अपीलकर्ते आनंद भाईक यांनी गेल्यावर्षी जुलैमध्ये माहिती आयोगकडे तक्रार केली होती. आयोगाने अपीलकर्ते आणि उत्तरवादी यांना यावर्षी २६ एप्रिलला तक्रारीवरील सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवले होते. मात्र प्राचार्य त्यावेळी अनुपस्थित राहिल्या. अपीलकर्ते भाईक यांनी महाविद्यालयाचे २०१२-१३चे वेळापत्रक माहिती अधिकारात मागितले होते. मात्र ते न दिल्याने प्राचार्याना १० हजार रुपयांचा दंड सोसावा लागणार आहे. तायवाडे महाविद्यालयाचे सर्वेसर्वा डॉ. बबन तायवाडे आहेत. ते प्राचार्य, शिक्षक व संस्थाचालकांचे प्रतिनिधीत्व करतात, असे असले तरी त्यांच्याच महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने राज्य माहिती आयोगापर्यंत तक्रार करावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वेळापत्रकात दडलय काय?

कोराडीच्या तायवाडे महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखा आहेत. बी.ए. प्रथम वर्षांला चार तुकडय़ा, द्वितीय वर्षांला दोन आणि तृतीय वर्षांला एक तुकडी आहे. बी.कॉम. प्रथम वर्षांला दोन तुकडय़ा आणि दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांला एकेक तुकडी आहे. बी.एस्सी. प्रथम वर्षांला दोन, द्वितीय आणि तृतीय वर्षांलाही एकेक तुकडी आहे. म्हणजे बी.ए.चे उदाहरण घेतल्यास तिन्ही वर्षांच्या एकूण सात तुकडय़ांच्या कामानुसार किंवा तुकडय़ांनुसार वेळापत्रक बनवायला हवे. मात्र, तसे न बनवता सर्व तुकडय़ा एकत्र करून एकच प्राध्यापक त्यांना शिकवतो. महाविद्यालयातील कामाचा भार आणि तुकडय़ा दाखवून राज्य शासनाचे आणि इतरही संस्थांचे अनुदान लाटले जाते. त्यामुळे महाविद्यालयात कधी वेळापत्रक तयारच करण्यात आले नव्हते.

महाविद्यालयाचे गौडबंगाल ‘नॅक’समोरही उघडकीस आल्याने मानांकन घसरले. गेल्यावर्षी पहिल्यांदाच ‘नॅक’ महाविद्यालयात आली होती. त्यात प्राध्यापकांनी नॅकच्या संचालकाला पत्र लिहून महाविद्यालयातील गैरप्रकार सांगितले होते. त्यामुळे महाविद्यालयाला बी प्लस मिळण्याची अपेक्षा होती. मात्र २.४ गुण मिळून ‘बी’ मानांकन मिळाले.

याबाबत डॉ. शरयू तायवाडे म्हणाल्या, चालू वर्षांचे वेळापत्रक न मागता त्यांनी मागील वर्षांचे मागितले. ते आमच्याकडे नव्हते. त्यामुळे आम्ही कशी काय माहिती पुरवणार? अद्याप मी तो निकाल पाहिलेला नसून १० हजार रुपयांचा दंड झाल्याचे कळले आहे. मात्र, अद्याप डॉ. बबन तायवाडे यांच्याशी चर्चा केलेली नाही. ते सध्या नागपूरबाहेर आहेत. ते आल्यावर वकिलांशी बोलून पुढे काय करायचे ते ठरवणार आहे.