माणुसकीला काळिमा, समाजमन सुन्न; मुलीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचा (नीरी) सेवानिवृत्त वैज्ञानिक दत्तक घेतलेल्या तीन मुलींवर अनेक वर्षांपासून बलात्कार करीत असल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पालकाने मुलींवर बलात्कार करून माणुसकीलाच काळिमा फासला असून या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

मकसूद अन्सारी मेहंदीहसन अन्सारी  असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा बारा वर्षांपूर्वी नीरीतून वैज्ञानिक म्हणून निवृत्त झाला. आजवर आरोपीने पाच ते सहावेळा लग्न केले आहे. परंतु एकही पत्नी त्याच्यासोबत कायमस्वरूपी राहिली नाही. शेवटची पत्नी त्याला चार वर्षांपूर्वी सोडून गेली. आरोपी हा शेवटच्या पत्नीसोबत राहात असताना मूलबाळ होत नव्हते. त्यामुळे २००८ साली त्याने एक मुलगी दत्तक घेतली. त्यानंतर पत्नीने त्याला मुलगा दत्तक घेण्यासाठी आग्रह केला. परंतु त्याने दुसरी व तिसरीही मुलगी दत्तक घेतली. त्यावेळी पत्नीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. आरोपीच्या रोजच्या वागण्यावरून पत्नीचा संशय बळावला आणि ती त्याला सोडून गेली.

तीनही पीडित मुली अनुक्रमे १६, ११ आणि ५ वर्षांच्या आहेत. पहिल्या मुलीवर २००८ पासून त्याने अत्याचार करण्यास सुरुवात केली. पहिली मुलगी दहावीत, दुसरी सहावी आणि तिसरी मुलगी पहिल्या वर्गात शिकत आहे. पहिल्या मुलीनंतर आरोपी हा दुसऱ्या व तिसऱ्या मुलीवरही सातत्याने अत्याचार करू लागला. त्यामुळे मोठय़ा मुलीने आपल्या वर्गमैत्रिणीकडे सर्व प्रकार सांगितले. त्यानंतर वर्गमैत्रिणी पीडित मुलीला तिच्या सावत्र आईकडे घेऊन गेली आणि त्यांनी लेखी स्वरूपात धंतोली पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि अटक केली. त्याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता न्यायालयाने २ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, नम्रता जाधव करीत असून शिपाई मोना चक्रवर्ती आणि प्रज्ञा तेलगोटे त्यांना सहकार्य करीत आहेत.